Pune Police News | 30 लाखांच्या जबरी चोरीचा गुन्हा न दाखल करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

Pune Crime News

पुणे : Pune Police News | ३० लाख रुपयांची जबरी चोरी झाल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यापार्‍याची तक्रार घेण्याऐवजी प्रॉपर्टी मिसिंगची नोंद करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात निलंबित केले जाणारे ते दुसरे पोलीस अधिकारी आहेत.

अक्षयकुमार नारायण गडगडे (Akshaykumar Narayan Gadgade) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. यापूर्वी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले होते.

पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे हे मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात कार्यरत होते़ ७ ऑक्टोंबर २०२६ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या परिसरात ३० लाख रुपयांची जबरी चोरी झाली होती. फिर्यादी श्रवण शंकरलालजी देवासी हे याबाबत माहिती व तक्रार देण्यासाठी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आले होते. या गुन्ह्याचा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले असताना गुन्हा दाखल करुन घेणे आवश्यक असताना पोलीस उपनिरीक्षक गडगडे यांनी प्रॉपर्टी मिसिंगचा प्रकार नोंद केली.

एक गंभीर गुन्हा दडपून टाकण्याचा प्रयत्न करुन गंभीर चुक केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. त्यावरुन तुमचे वर्तन हे कर्तव्याप्रती निष्काळजी, बेशिस्तपणाचे व बेजबाबदारपणाचे असून शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन करणारे आहे. त्यामुळे अक्षयकुमार गडगडे यांना अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी निलंबित केले आहे.

सॅलसबरी पार्क येथे मार्केटयार्ड येथील व्यापार्‍याला मारहाण करुन लुबाडण्याचा प्रयत्न झाला होता. व्यापार्‍याने हातातील रोकड असलेली बॅग सोडली नव्हती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्वारगेट पोलिसांनी निहाल नवनाथ अडागळे (वय १९, रा. मुंढवा) आणि यश प्रवीण सोनवणे (वय २४, रा. मांजरी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात हा जबरी चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर मार्केटयार्ड परिसरात एका व्यापार्‍याच्या कामगाराला मारहाण करुन ३० लाख रुपये लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रॉपर्टी मिसिंगची नोंद केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला लावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांना निलंबित केले होते. त्यानंतर आता याप्रकरणात दुसरी कारवाई करण्यात आली आहे़.

You may have missed