Pune Crime News | दोन कोटींच्या सायबर फसवणुकीत बेळगावाहून दोघे सायबर चोरटे जेरबंद; व्हॉटसअपवर कंपनीच्या मालकाचा डिपी ठेवून मेसेज करुन केली होती फसवणुक
पुणे : Pune Crime News | व्हॉटसअपवर कंपनीचा मालक मेसेज करीत असल्याचे (डीपीवर मालकाचा फोटो) भासवून त्यांना क्लाइंटचे पेमेन्ट करायचे असल्याचे सांगून कंपनीची १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक (मॅन ईन मिडल सायबर फ्रॉड) केल्याप्रकरणात सायबर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथून दोघांना अटक केली आहे.
अजय रामविलास यादव Ajay Ramvilas Yadhav (वय २२, रा. लक्ष्मीनगर, काकटी, बेळगाव) आणि सलमान गोस मोहियोद्दीन अजनाल Salman Ghouse Mohiuddin Ajnal (वय ३२, रा. झटपट कॉलनी, बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत कोथरुड येथील एका कंपनीतील अकाऊंट मॅनेजरने सायबर पोलीस ठाण्यात ३० जानेवारी २०२६ रोजी फिर्याद दिली होती. त्यांना कंपनीच्या मालकाचा फोटो डीपीवर असलेल्या व्हॉटसअपवरुन २८ जानेवारी रोजी मेसेज आला. त्यावरुन किन्नया या नावाच्या बँक खात्यावर ९५ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्या मेसेजमध्ये कंपनीच्या कोणत्या खात्यातून पैसे पाठवायचे हेही दिलेले होते. त्यामुळे फिर्यादींना ते खरे वाटले. त्यानुसार त्यांनी पैसे पाठविले. त्यानंतर दुसर्या दिवशी आणखी एका खात्यावर १ कोटी रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी १ कोटी रुपये पाठविले.
त्यानंतर ३० जानेवारी रोजी पुन्हा त्यांना त्याच क्रमांकावरुन मेसेज आला. त्यात त्यांनी १ कोटी ९० लाख रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु, दुपारी १२ वाजून गेले असल्याने पेमेंटला उशीर होणार होता. त्यामुळे त्यांनी हडपसरमधील मालकाच्या कार्यालयात लँडलाईनवर संपर्क केला. तेव्हा त्यांच्या मालकांनी मी असे कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्यास सांगितले नसल्याचे म्हणाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा व्हॉटसअप चॅटिंग ओपन करुन पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,व्हॉटसअप धारकाचा डिपी व नाव त्यांच्या मालकाचे असले तरी तो मोबाईल क्रमांक त्यांच्या मालकाचा नसून अनोळखी नंबर आहे. त्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्यात वापरण्यात आलेले अॅक्सीस बँक खाते हे कन्नया इंटरप्रायझेस या नावाने बेळगाव येथील असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बँक खातेधारक वापरकर्ता यांचा मुलगा अजय यादव याला ताब्यात घेतले. त्याच्या सांगण्यावरुन सलमान अजनाल याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ मोबाईल फोन, अॅक्सीस बँकेचे पासबुक व डेबीट कार्ड जप्त केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशामुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ,सहायक पोलीस आयुक्त शुभदा संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे, पोलीस अंमलदार संदेशा कर्णे, प्रविणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शितल डांगे, अनिकेत भिंगारे यांनी केली आहे.
पोलिसांचे आवाहन
शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष, अटकेची भिती, पार्सलमध्ये ड्रग्ज, इलेक्ट्रिसिटी/ गॅस कनेक्शन बंद होईल, ऑनलाईन बँक केवायसी अपडेट अशी प्रलोभने व धमक्या प्राप्त झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, जेणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल, असे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.
कंपन्यांच्या फसवणुकीच्या अनुषंगाने नियमित वापरतो, ई मेल मध्ये किरकोळ/ क्षुल्लक बदल करुन तसेच व्हॉटसअपवर मालकांचा फोटो डिपी म्हणून वापरुन त्याद्वारे मालकच बोलत असल्याचे भासवुन कंपन्यांची फसवणूक करण्यात येत आहे. तरी कंपनी मालकांनी त्यांच्या अकाऊंट सेक्शनमध्ये काम करणाºया सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सुसंवाद ठेवावा. मोठ्या रक्कमांचे ट्रान्झेक्शन करताना प्रत्यक्ष संवाद साधावा. त्यामुळे अशा प्रकारच्या (मॅन ईन मिडल) गुन्ह्यांना आळा बसेल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
