Pune PMC News । पुणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांच्या कुटुंबियांना दिलासा ! सेवेत असताना मृत्यू झाल्यास तातडीची २ लाखांची मदत
ऑनड्युटी मरण पावल्यास ५ लाख रुपये मदतीचा महापालिका आयुक्तांचा निर्णय
पुणे : Pune PMC News । महापालिकेच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कुटुंबियांना कामगार कल्याण निधीतून देण्यात येणार्या रकमेत दुपटीहून अधिक वाढ करत ही रक्कम २ लाख रुपये करण्यात आली आहे. तर ड्युटीवर असताना निधन झाल्यास देण्यात येणारी मदतीची रक्कमही ५ लाख रुपये करण्यात आली आहे. यापुर्वी सेवेत असताना परंतू ड्युटीवर नसताना मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबियांना ७५ हजार रुपये तातडीची मदत करण्यात येत होती. याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेमध्ये सुमारे १८ हजार कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त आहेत. सेवेत असताना आजारपणामुळे अथवा अपघातामुळे मरण पावणार्या अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतून मदत करण्यात येते. सेवेत असताना परंतू ड्युटीवर नसताना मृत्यू झालेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कुटुंबियांना यापुर्वी कामगार कल्याण विभागाच्या वतीने या अगोदर २२ हजार ५०० आणि महापालिकेच्या निधीतून ५२ हजार ५०० रुपये अशी ७५ हजार रुपयांची मदत करण्यात येत होती. १ जानेवारी २०२६ पासून या निधीत वाढ करण्यात आली असून सेवेत असताना मृत्यू झालेले अधिकारी अथवा कर्मचार्यांच्या कुटुंबियांना कामगार कल्याण निधीतून ३० हजार रुपये आणि महापालिकेच्या निधीतुन १ लाख ७० हजार अशी २ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
ड्युटीवर असताना मृत्यू झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबियांना यापुर्वी कामगार कल्याण निधीतून २ लाख रुपये तातडीची मदत करण्यात येत होती. १ डिसेंबर २०२५ नंतर ऑनड्युटी मरण पावलेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या निधीतून ५ लाख रुपये मदत मिळणार आहे. यासाठी कामगार कल्याण निधीचा वापर केला जाणार नाही, असा निर्णय १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासकराज असताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश नुकतेच २ मार्च रोजी महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना दिले आहेत.
ही योजना कामगार कल्याण निधीच्या नियमानुसार पात्र वारसांसाठीच असणार आहे. यासाठी वारसांना विहीत नमुन्यांत अर्ज आणि संबधित कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. तसेच संबधित विभागांनी देखिल अधिकारी अथवा कर्मचार्याच्या मृत्यूच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आतमध्ये संबधित कर्मचार्याच्या वारसांना योजनेबाबत माहिती कळविणे आणि त्यांच्याकडून परिपूण अर्ज भरून घेणे बंधनकारक राहाणार आहे.
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी चतुर्थ श्रेणी कामगारांसह सर्वच कामगारांची पदोन्नती, दीर्घकाळ सेवेतील पात्र ठरणार्या कर्मचार्यांना सेवेत कायम करणे असे निर्णय घेतले आहेत. साधारण तीन -चार महिन्यांपुर्वी महापालिका भवन येथे ड्युटीवर असतानाच मरण पावलेल्या एका चतुर्थ श्रेणी कामगाराच्या कुटुंबियांची दखल घेत सेवेत असताना आणि ड्युटीवर असताना मरण पावलेल्या अधिकारी, कर्मचार्यांना महापालिका करत असलेल्या आर्थिक मदतीची माहिती घेतली. यानंतर त्यांनी अधिकार्यांशी चर्चा करून तातडीने मदतीच्या रकमा वाढविण्याचा निर्णय घेतला.
