Maharashtra Weather Alert | राज्यात उन्हाचा चटका वाढला; मुंबईसह चार जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather

मुंबई : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात उष्णतेबरोबरच दमट वातावरण राहणार असल्याने उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तापमानात वाढ होत असून काही ठिकाणी पारा ३९ ते ४० अंशांच्या आसपास जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता नसून, हवामान कोरडे राहणार आहे.

पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील शहरांमध्येही तापमान हळूहळू वाढताना दिसत आहे. सकाळच्या वेळी किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघात टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

You may have missed