Pune Baner Accident News | बाणेर (पुणे) : स्कुल बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिल्याने ट्रॉली उडून मोटारसायकलवर पडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यु (Video)

Pune Baner Accident News | Baner (Pune): Delivery boy dies after school bus hits tractor trolley while trying to overtake, trolley flies off and falls on motorcycle (Video)

पुणे : Pune Baner Accident News | बाणेर येथील ननावरे पुल ते राधा चौक दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर भरधाव जाणार्‍या स्कुल बसने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन आलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरात धडक दिली. त्यात ही ट्रॉली उडून मागील बाजूने येणार्‍या मोटारसायकलवर पडली. त्यात डिलिव्हरी बॉयचा मृत्यु झाला.

https://www.instagram.com/p/DVvqiBTCbn7

शिवाजी उत्तमराव शिंदे (वय ५३, रा. पांडुरंग शिंदे चाळ, सायकर मळा, बाणेर) असे मृत्यु पावलेल्या झेप्टो डिलिव्हरी करणार्‍यांचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गजानन शिवाजी शिंदे  (वय २६, रा. सायकर मळा, बाणेर) यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ध्रुव इंटरनॅशनल स्कुल (Dhruv International School) बसचा चालक विकास भगवानराव गोंगे Vikas Bhagwanrao Gonge (वय ३५, रा. बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात स्कुल बस चालक विकास गोंगे हाही जखमी झाला आहे. हा अपघात ननावरे पुल ते राधा चौक दरम्यान मर्लिन व्हेंटाना साईटजवळील सर्व्हिस रोडवर ११ मार्च रोजी दुपारी पावणे पाच वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिंदे हे आपल्या दुचाकीवर डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. विकास गोंगे हा ध्रुव इंटरनॅशनल स्कुलची बस घेऊन शाळेतील मुलांना सोडून पुन्हा परत जात होता. सर्व्हिस रोडवर भरधाव जाताना त्याने एका वाहनाला ओव्हरटेक करुन जात असताना समोरुन येणारा ट्रॅक्टर त्याला दिसला. त्याने ट्रॅक्टरला होणारी धडक टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, बस वेगात असल्याने ट्रॅक्टर पुढे गेला तरी त्याच्या ट्रॉलीला बसची जोरात धडक बसली. या ट्रॅक्टरच्या मागे दुचाकीवर शिवाजी शिंदे चालले होते. बसची धडक बसल्याने ट्रॉली वेगाने फिरली आणि उंच उडून ती मागे असलेल्या दुचाकीवर पडली. अंगावर ट्रॉली पडल्याने त्यात गंभीर जखमी होऊन शिवाजी शिंदे यांचा मृत्यु झाला.  बसचालक विकास गोंगे हाही जखमी झाला असून बाणेर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत.

You may have missed