Baramati byelection 2026 | सुनेत्रा पवारांचा फोनही ठरला निष्फळ! बारामतीत काँग्रेसचा ‘पंजा’ सरसावला; उमेदवारी मागे घेण्यासाठी घातली ही अट
पुणे : Baramati byelection 2026 | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी एक खळबळजनक पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच, मोरे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी सरकारसमोर एक अत्यंत कडक अट ठेवली आहे.
आकाश मोरे यांनी स्पष्टपणे जाहीर केले की, जर महाराष्ट्र सरकारने अजित पवार यांच्या या विमान अपघात प्रकरणी तातडीने एफआयआर दाखल केला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली, तर ते बारामती पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी त्वरित मागे घेतील. “मला निवडणूक लढवून आमदार होण्यापेक्षा अजितदादांच्या मृत्यूचे सत्य समोर येणे आणि त्यांना न्याय मिळणे जास्त महत्त्वाचे वाटते,” असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते, तर दुसरीकडे महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने आकाश मोरे यांच्या रूपाने उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणली होती. मात्र, आता मोरे यांनी थेट चौकशीची मागणी करत चेंडू सरकारच्या दरबारात टाकला आहे. मोरे यांच्या या भूमिकेमुळे आता सरकार यावर काय पाऊल उचलणार आणि बारामतीची निवडणूक खरोखरच बिनविरोध होण्याच्या दिशेने जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, निवडणुकीच्या प्रचारात आता विकासाच्या मुद्द्यांऐवजी अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
