Pune Crime News | हातउसने घेतलेले पैसे परत मागितल्याने पिस्तूल रोखून टोळक्याने केली मारहाण; स्वारगेट पोलिसांनी दोघांना केली अटक, शंकररोड वरील धोबी घाट स्मशानभूमीतील घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | हात उसने दिलेले पैसे परत मागितल्यातून झालेल्या वादावादीत टोळक्याने पिस्तुल रोखून तिघांना बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याविरोधात आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे.

याबाबत कानिफनाथ विष्णु नायडु (वय ५१, रा. काशेवाडी, सेवक मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रेहान ऊर्फ खिम्या फिरोज शेख Rehan alias Khimya Firoz Shaikh (वय १९) आणि गौरव गुजर (वय २१, दोघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार आतिक, अजिम सलिम शेख ऊर्फ चोर, पियुष परदेशी, पवन उमाप (सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शंकरशेठ रोडवरील धोबी घाट स्मशानभूमी येथील काली मंदिर येथे ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. या घटनेत फिर्यादी व त्यांचे भाचे नमन ठाकूर (वय २२) आणि विल्सन ठाकूर हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे भाचे हे स्मशानकाली मंदिर येथे दर्शनाकरीता गेले होते. त्यावेळी तेथे नायडू यांनी आरोपींना दिलेले हातउसने पैसे परत मागितल्याने वाद झाला. तेव्हा आरोपींनी त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हत्याराने तोंडावर मारुन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. त्याचे भाचे नमन व विल्सन हे त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांच्यावर पिस्तुल रोखून तुम्ही मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक बी पी शिरसाठ तपास करत आहेत.

याविरोधात अजित सलिम शेख (वय २७, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दुखापत केल्याचा कानिफनाथ नायडु व विल्सस ठाकूर (दोघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अजित शेख हे दारु पिण्याकरीता मित्रांची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी कानिफनाथ नायडु व त्यांचे भाचे आले. त्यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणी वरुन वाद झाला. तेव्हा कानिफनाथ नायडु याने बाजूला पडलेल्या  लाकडी बांबुने अजित शेख यांच्या कपाळावर मारुन जखमी केले.

You may have missed