Pune Crime News | लेखक संपत जाधव यांना पिस्तुल दाखवून  मारहाण करण्याचा प्रकार, सारसबाग परिसरातील घटनेत स्वारगेट पोलिसांनी ५ जणांवर केला गुन्हा दाखल

crime-logo

पुणे : Pune Crime News | सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळा येथे प्रसिद्ध लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करुन पिस्तुल दाखवून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत दीपक कुंडलिक कसबे (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सहदेव ढावरे (वय ४२, रा. घोरपडे पेठ), प्रवीण पोपटराव शेलार Praveen Popatrao Shelar (वय ३६), प्रमोद नाडे (वय २३), स्वप्नील सोनवणे (वय २२), ओंकार हिंगे (वय २१, सर्व रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळा येथे १८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजातील आरक्षणाबाबत सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात शनिवारी १८ एप्रिल रोजी रात्री बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री दहाच्या सुमारास बैठक संपल्यानंतर लेखक संपत गणपत जाधव तेथे थांबले होते. त्या वेळी आरोपींनी जाधव यांना शिवीगाळ केली. त्या वेळी फिर्यादी कसबे यांनी मध्यस्थी करुन आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रविण शेलार याने तुझा मर्डर करेन, असे म्हणून त्यांच्या कानाखाली मारली. तेव्हा बाजूला उभे असलेल्या कारमधून स्वप्निल सोनवणे व ओंकार हिंगे हे उतरले. सोनवणे याने त्याच्याबरोबर आणलेली पिस्तुल प्रमोद नाडे याच्याकडे देऊन ती उलटी धरुन मारली. तेव्हा प्रविण शेलार म्हणाला, त्याच्या डोक्यात गोळी घालून मारुन टाक. त्यावर फिर्यादी यांनी पळण्याचा प्रयत्न केला. स्वप्निल सोनवणे याने त्याच्याकडील स्प्रे फिर्यादी व त्याच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यावर मारला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीत फिर्यादी यांच्या खिशातील २ हजार रुपये पडून गहाळ झाले. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

You may have missed