Pune PMC News | वित्तीय समिती कुठल्याही परिस्थितीत बंद करणार नाही; महापालिका आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत ठणकावून सांगितले

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | महापालिकेचे अंदाजपत्रक १६ हजार कोटी रुपयांचे असले तरी उत्पन्न ९ हजार कोटींच्या आसपास आहे. या पार्श्वभूमीवर कामांचा आणि खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून नियोजन करण्यासाठी ‘ वित्तीय समिती ‘ आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत वित्तीय समिती रद्द केली जाणार नाही, असे ठाम उत्तर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज सर्वसाधारण दिले.

भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महिन्याभराच्या अंतराने पुन्हा सर्वसाधारण सभेत वित्तीय समिती रद्द करण्याचा विषय उपस्थित केला. शहराच्या विकासाच्या गतीमध्ये वित्तीय समिती आड येते. अनेक प्रकल्प केवळ वित्तीय समितीमुळे ठप्प आहेत. वित्तीय समिती रद्द केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही.

यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आपल्याला वित्तीय समितीमुळे काय त्रास झालाय? हे मला सांगा. वित्तीय समितीचे प्रयोजन नगरसेवकांवर अंकुश ठेवण्यासाठी नाही. पालिकेचे अंदाजपत्रक १६ हजार कोटींचे आहे तर उत्पन्न केवळ ९ हजार कोटींचे आहे. मला विकास आणि महसुली खर्च ९ हजार कोटींमध्ये बसवायचे आहेत. यासाठी कामांचा व खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवताना अधिकाऱ्यांवर अंकुश रहावा आणि त्यांना दिशा मिळावी यासाठी वित्तीय समिती गरजेची आहे. यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही समिती मी रद्द करणार नाही. तुमच्या अधिकारात ही समिती बंद करायची असेल तर तुम्हीं करू शकता. मी दुसऱ्या नावाने माझ्या अधिकारात सुरू करेन, असे थेट सुनावले. यामुळे भाजपचे नगरसेवक धीरज घाटे संतापले. त्या समितीचे नाव विलंबिय समिती ठेवा, असा टोला लगावला. यावर महापौर मंजुषा नागपुरे यांनी मध्यस्थी करत पुढील दोन दिवसांत सभागृह नेत्यांनी गटनेत्यांना सोबत घेऊन आयुक्तांशी चर्चा करावी असे आदेश देत या विषयावर पडदा टाकला.

You may have missed