Pune Crime News | पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून आत्याच्या मुलाने तरुणाचा केला खुन; बिबवेवाडी-कोंढवा रोड वरील पहाटेची घटना, मार्केटयार्ड पोलिसांनी एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | किरकोळ कारणावरुन आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक व लाकडी बॅटम पट्टीने मारहाण करुन त्याचा खुन केला. मार्केटयार्ड पोलिसांनी आत्याच्या मुलाला अटक केली आहे.
रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. कौशल लांडगे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार अंश पटेल (वय १८) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बिबवेवाडी – कोंढवा रोडवरील अश्विनी पॅराडाईस सोसायटीजवळ सोमवारी पहाटे पावणे पाच वाजता घडला. याबाबत रोहन ओव्हाळ च्या बहिणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन ओव्हाळ हा काही काम धंदा करत नाही. तो युट्युबवर रील बनवित असतो. कौशल लांडगे हा त्याचा आत्येभाऊ आहे. त्यांच्यात काही कारणावरुन भांडणे झाली होती. त्यावेळी कौशल व अंश पटेल यांनी पेव्हर ब्लॉकने व लाकडी बॅटम पट्टीने रोहन याच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाला. मार्केटयार्ड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन कौशल लांडगे याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तपास करीत आहेत.
