Pune Crime News | कोयत्याचा धाक दाखवुन महामार्गावर तरुणाला लुटणार्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पाळत ठेवून २ लाख लुटले
पुणे : Pune Crime News | बंगळुरु -मुंबई महामार्गावरील वाईन शॉपच्या कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील २ लाख रुपयांची रोकड चोरुन नेणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना नर्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पकडले.
यश सतीश खवले Yash Satish Khawale (वय २०, रा. स्वास्तिक सोसायटी, व्हिजन स्कूलजवळ, नर्हे), ऋषिकेश उद्धव लाखे Rishikesh Uddhav Lakhe (वय २०, रा. साई व्हिला सोसायटी, वाल्हेंकर चौक, नर्हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बंगळुरु – मुंबई महामार्गावरील नर्हे परिसरातील एका मद्य विक्री दुकानात काम करणारा कर्मचारी दिवसभरातील दुकानात गोळा झालेली २ लाख रुपयांची रोकड घेऊन मालकाच्या घरी देण्यासाठी दुचाकीवरुन जात होता. सर्व्हिस रोडवरील पेट्रोलपंपाजवळ दोघा तरुणांनी त्याला अडविले. कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील २ लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरी करुन घेऊन गेले होते.
जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात दोघे वाईन शॉपच्या वर असलेल्या बारमध्ये दारु पिण्यासाठी येत असल्याचे दिसून आले. त्यांची नावे निष्पन्न झाली. त्यांचा शोध घेत असता ते गावाला गेल्याचे दिसून आले. तेथून ते परत आले. परंतु, ते घरी जात नव्हते. संशयित आरोपी हे स्वामी नारायण मंदिर मागील गेटजवळील बंद मंगल कार्यालय येथील मोकळया जागेत थांबले असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली. नर्हे पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला.
ते नेहमी या वाईन शॉपच्या वरील बारमध्ये दारु पिण्यास जात असत. वाईन शॉप बंद होण्यापूर्वी एक जण येऊन तेथील कॅश घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले होते. यावरुन त्यांनी पाळत ठेवून त्याला लुटले होते.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलली २ लाख रुपयांची रोकड, दुचाकी, कोयता, एक मोबाईल असा ३ लाख ७ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नर्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार नीलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेडे यांनी केली.
