Pune Crime News | पुणे : 21 वर्षीय तरुणीचे फोटो मॉर्फ करून बदनामी केल्याप्रकरणी बुद्धभूषण चंद्रकांत गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : एका तरुणीचे फोटो मॉर्फ करून बनावट इन्स्टाग्राम खात्याद्वारे तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत २१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली असून, त्यावरून बुद्धभूषण चंद्रकांत गायकवाड Buddhabhushan Chandrakant Gaikwad (वय २३, रा. मोरे वस्ती, जामखेड) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपीने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून तक्रारदार तरुणीचे फोटो तिच्या परवानगीशिवाय वापरले. त्या खात्यावरून स्वतःला तीच तरुणी असल्याचे भासवत अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करण्यात येत होते.
तसेच, आरोपीने तरुणीचा फोटो स्वतःसोबत मॉर्फ करून ती त्याची ‘गर्लफ्रेंड’ असल्याचे भासवत सोशल मीडियावर प्रसारित केला. याशिवाय, इतर मुला-मुलींचे फोटोही त्या बनावट खात्यावर अपलोड करण्यात आले होते. तरुणीला अश्लील संदेश पाठवणे, चॅटिंग करणे आणि शिवीगाळ करून तिची बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
