Support To Marathi Compulsion | मराठी सक्तीला पुणे-पिंपरी चिंचवडमधून रिक्षाचालकांचा पाठिंबा; विरोधाची भाषा चुकीची
पुणे : Support To Marathi Compulsion | राज्य सरकारने १ मे महाराष्ट्र दिनापासून रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठीत बोलणे सक्तीचे करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयाला पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रिक्षाचालक संघटनांनी स्पष्ट पाठिंबा दिला असून, विरोधाची भाषा करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मुंबईत या निर्णयाविरोधात ४ मे रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारचा विरोध दिसून आलेला नाही. या दोन्ही शहरांमध्ये बहुसंख्य रिक्षाचालक मराठी असून, परप्रांतीय चालकांची संख्या कमी व ते संघटित नसल्यामुळे विरोधाचा सूर उमटलेला नाही.
रिक्षा पंचायत, ‘बघतोय रिक्षावाला’ तसेच इतर संघटनांनी मराठी भाषा सक्तीला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘ज्या ठिकाणी व्यवसाय करतो, त्या ठिकाणची भाषा येणे आवश्यक आहे,’ असे मत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
रिक्षा पंचायतचे नितीन पवार यांनी सांगितले की, रिक्षाचालकांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून हा वाद उकरून काढला जात आहे. तर ‘बघतोय रिक्षावाला’चे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी मराठी सक्तीला पाठिंबा देत विरोध करणाऱ्या संघटनांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला.
आप रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अंकुश आनंद यांनीही अध्यादेशाला समर्थन दर्शवले. परप्रांतीय चालकांना मराठी शिकवण्याची तयारी आमची आहे, मात्र विरोधाची भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रिक्षाचालक कल्याण महामंडळ प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
