Pune Water Supply | …यामुळे सलग दुसऱ्यादिवशी पाणी पुरवठा होऊ शकला नाही; पुण्यात आज ‘या’ वेळेत होणार पाणी पुरवठा
प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नगरसेवक कुणाल टिळक, काशिफ सय्यद, अनिता इंगळे, स्वरदा बापट, धनश्री कोल्हे यांनी सभागृहात केली
पुणे : Pune Water Supply | खडकवासला ते पर्वती जलकेंद्रपर्यंत च्या मुख्य वाहिनीवर फ्लो मीटर बसवण्याचे काम करण्यास जागेवरील अडचणीमुळे कामाला ५-६ तास विलंब झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत काम संपेल. लष्कर, कोथरूड, औंध व नाना पेठ येथे दुपारी ३ पर्यंत पाणी पुरवठा होईल. उर्वरीत जलकेंद्रात कालव्यातून पाणी उचलण्यात येत असून जलकेंद्रात येऊ लागल्याने १२ वाजल्यानंतर हळूहळू पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी आज सर्वसाधारण सभेत दिली.
शहरातील जलकेंद्र व पाईप लाईन वर फ्लो मीटर बसवण्याचे काम करण्यासाठी महापालिकेने गुरुवारी क्लोजर घेतला होता. यावेळी ४५ स्वरूपाची कामे पूर्ण करण्यात आली. यापैकी खडकवासला ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या २ हजार एम एम च्या लाइनवर फ्लो मीटर बसवण्याचे काम जागेवर अडचणी आल्याने ५- ६ तास विलंब होत आहे. आज दुपारी तीनपर्यंत पूर्ण होईल.
दरम्यान, पर्वती केंद्रात कालव्यातून पाणी उचलण्यात येत असून जलकेंद्रांमध्ये पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. तासाभरात पाणी पुरवठा सुरू होईल. मागील २४ तास पाणी नसल्याने पाणी पुरवठा उशिरा पर्यंत सुरू ठेवण्यात येईल.
खडकवासला येथेही पाईपलाईनवर फ्लो मीटर बसवण्याचे काम करण्यात आले आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच हा मीटर बसवण्याचे काम झाले आहे. या मीटर मुळे भविष्यात शहरातील पाणी गळती कोठे होते हे समजणे आणि त्यावर उपाय करणे सोपे होणार आहे, असे कौर यांनी यावेळी सांगितले.
शहरात दुसऱ्या दिवशी देखील पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. टँकर देखील उपलब्ध होत नाहीत. ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नगरसेवक कुणाल टिळक, काशिफ सय्यद, अनिता इंगळे, स्वरदा बापट, धनश्री कोल्हे यांनी सभागृहात केली.
