Pune Crime News | जागेचे खरेदी खत झाले असतानाही कुलमुखत्यार पत्र करुन देऊन व्यावसायिकाला 15 लाखांचा घातला गंडा, सिंहगड रोड पोलिसांनी पितापुत्रावर दाखल केला गुन्हा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | दुसर्‍याबरोबर खरेदी खत झाले असताना दुसर्‍याचा प्लॉट आपला असल्याचे व तो विकसित करायचा असल्याचे सांगून कुलमुखत्यार पत्र तयार करुन देऊन व्यावसायिकाची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आनंद गोकुळ साळुंके (वय ४८, रा. मिरा सोसायटी, स्वारगेट) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भरत ऊर्फ सागर विठ्ठल धुमाळ (Bharat alias Sagar Vitthal Dhumal) आणि विठ्ठल गणपतराव धुमाळ Vitthal Ganapatrao Dhumal (दोघे रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट एरिया, सिंहगड कॉलेज रोड, वडगाव, मुळ रा. वीर, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव येथील आरोपींच्या घरी ऑगस्ट २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आर्कीटेक्चर व्यवसाय आहे. ते ऑगस्ट २०२४ मध्ये गावी वीर येथे गेले असताना गावातील पुजारी प्रसाद गुरव यांनी सांगितले की, आपल्या गावातील भरत धुमाळ यांचा सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात प्लॉट असून त्यांना विक्री अथवा विकसन करायचा आहे. त्यांनी भरत धुमाळ यांची ओळख करुन दिली. त्यानंतर साळुंके यांनी जागेची कागदपत्रे, सातबारा पाहिला. त्याची खात्री करुन २३ ऑगस्ट २०२४ रोजी या जागेचे त्यांनी कुलमुखत्यार पत्र केले. भरत व विठ्ठल धुमाळ यांना १५ लाख रुपये दिले. त्यानंतर एक महिन्याने ते जागेची पाहणी करायला गेले. तेथे जागेवर बांधकामाचे पोल रोवलेले दिसले. त्यांनी विचारपूस केल्यावर भरत धुमाळ यांनी  तो प्लॉट मते यांचा असून मला पैशांची गरज असल्याने मी तुमच्याशी खोटे बोलुन खोटे कुलमुखत्यार पत्र केले आहे.

तरी मी तुमचे घेतलेले पैसे परत करेल, त्याचे व्याजही तुम्हाला देतो, माझ्या वडिलांचा सुद्धा येथे प्लॉट असून तो मला सापडत नाही. मी तुम्हाला माझेच वडिलांचे सात बारावर कुलमुखत्यार पत्र करुन दिलेले आहे. परंतु, तो कोठे आहे, याबाबत माहिती नाही. माझा शनिवार पेठेतील फ्रुॅट स्टॉल विकुन तुमचे पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर १५ फेब्रुवारी २०२५ रोजी गावच्या यात्रेमध्ये भरत धुमाळ भेटला. तेव्हा तेथे वादावादी झाली. यात्रामध्ये वादावादी नको, २ महिन्यात भरत धुमाळ तुमचे पैसे देतील, असे आश्वासन गावातील लोकांनी दिले. भरत धुमाळ याने २ महिन्याचा चेक दिला. दोन महिन्यानंतरही भरत धुमाळ पैसे देण्यास टाळाटाळ करु लागला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.

दरम्यान, या अर्जाची चौकशी सुरु असताना त्यांना समजले की  भरत धुमाळ याने त्यांना ज्या जागेचे कुलमुखत्यार पत्र करुन दिले. त्याच्या अगोदर १५ मार्च २०२४ रोजी प्रशांत अंकुश उंद्रे (रा. हडपसर) यांच्याशी त्याच जागेचे खरेदी खत केलेले होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना सुद्धा जागा दिली नाही. आनंद साळुंके यांच्याबरोबर केवळ कुलमुखत्यार पत्र करुन १५ लाख रुपये घेऊन फसवणुक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी तपास करीत आहेत.

You may have missed