Pune ACB Trap Case | भुजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी 2 लाखांची लाच घेणारे दोन भूवैज्ञानिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
पुणे : Pune ACB Trap Case | इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखल मिळण्यासाठी आवश्यक असलेला भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी २ लाखाची लाच घेताना भूजल सर्वेक्षण विभागातील दोघा अधिकार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर नामदेव धोटे Diwakar Namdev Dhote (वय ५३, रा. संकेश्वर रॉयल सोसायटी, जाधववाडी, चिखली), कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका संदीपान घुले Priyanka Sandipan Ghule (वय ३९, रा. कुमार प्रिन्स विल्हे, जाधववाडी, मोशी) अशी दोघा लाचखोर अधिकार्यांची नावे आहेत. ही कारवाई शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भुवैज्ञानिक याच्या कार्यालयात शुक्रवारी करण्यात आली.
तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांनी इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला होता. पीएमआरडीएकडून त्यांना भुजल सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळे तक्रारदारांनी भूजल सर्वेक्षण विभागाकडे अहवाल मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो अहवाल देण्यासाठी प्रियंका घुले यांनी दिवाकर धोटे यांच्यासाठी अडीच लाखाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत २२ एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. त्यावेळी घुले यांनी धोटे यांना तक्रारदारांना भेटून बोलण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे धोटे याला भेटले. त्यांनी तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन ही लाचेची रक्कम घुले यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी प्रियंका घुले यांना तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये स्वीकारताना सापळा रचून पकडले. त्यानंतर दिवाकर धोटे याला कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली.
या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने अधिक तपासासाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास हट्टेकर व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत.
