Pune Crime News | ‘‘तू भुमिपुत्राला मारले ना, तुलाही भावपूर्ण श्रंद्धाजली’’ ! खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा सलुनमध्ये गोळीबार, दोन तरुण जखमी; वारजेतील घटनेत घटनास्थळावरच पोलिसांनी एकाला केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | भुमिपुत्र कांबळे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने सलुनमध्ये शिरुन तरुणावर गोळीबार केला. या घटनेत दोन तरुण जखमी झाले़ याचवेळी वारजे पोलिसांचे तपास पथक त्या ठिकाणी गस्त घालत होते. त्यांनी एका आरोपीला जागेवरच पकडले. त्यानंतर रात्री उशिरा आणखी एका आरोपीला अटक केली आहे.
या घटनेत नेहाल रवींद्र शिंदे (वय २०, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) आणि अमोल आढाव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. नेहाल शिंदे याच्या कानाजवळ गोळी लागली. तर त्याच्या शेजारील खुर्चीवर बसलेल्या अमोल आढाव याच्या गुडघ्या खाली पायात गोळी घुसली. ही घटना वारजे येथील यशोदीप चौकाजवळील हेअर अॅडीक्ट या सलुनमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
याबाबत उषा रवींद्र शिंदे (वय ४४, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साहिल राऊत (वय २०) आणि प्रीतम ठोंबरे (वय २५, रा. वारजे) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार अजिंक्य चव्हाण, आशिष पडीले, सोहम सातव आणि आर्यन नगाले यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आणि जखमी नेहाल शिंदे याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत.
पूर्ववैमनस्यातून भुमिपुत्र युवराज कांबळे (वय २३, रा. वारजे) याचा ३१ डिसेंबर २०२२ रोजी निर्घुण खुन करण्यात आला होता. भुमिपुत्र कांबळे हा मित्रासह वारजेतील विठ्ठलनगर परिसरातून जात असताना टोळक्याने त्याच्यावर हल्ला करुन निर्घुण खुन केला होता. वारजे पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यात नेहाल शिंदे याचा समावेश होता. त्यावेळी तो अल्पवयीन होता.
नेहाल शिंदे हा शुक्रवारी सायंकाळी केस कापण्यासाठी हेअर अॅडीक्ट सलुनमध्ये गेला होता. यावेळी दुचाकीवरुन हल्लेखोर आले. त्यांनी भुमिपुत्र कांबळे याच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने नेहाल शिंदे याला म्हणाले ‘‘तू भुमिपुत्राला मारले ना, तुलाही भावपूर्ण श्रंद्धाजली’’ असे म्हणत त्यातील साहिल राऊत आणि अजिंक्य चव्हाण यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून नेहाल याच्या दिशेने गोळीबार केला. नेहाल हा खुर्चीवर बसला असताना गोळी त्याच्या डाव्या कानाला चाटून गेली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या शेजारील खुर्चीवर केस कापण्यासाठी अमोल आढाव बसला होता.
पहिली गोळी झाडताना झटका बसल्याने साहिल राऊत याचा नेम चुकला. त्यामुळे दुसरी गोळी खाली झाडली गेली. ती अमोल आढाव याच्या पायात घुसली. यावेळी झालेल्या झटापटीत पिस्तुल फाटल्याने तसेच काच फुटून साहिल राऊत जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरास एकच धावपळ उडाली. त्याचवेळी वारजे पोलीस ठाण्यातील तपास पथक परिसरात गस्त घालत होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी तेथे धाव घेतली. हाताला लागलेल्या साहिल राऊत याला पोलिसांनी जागेवरच पकडले. अन्य आरोपी पळून गेले. त्यानंतर रात्री उशिरा प्रीतम ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी व अन्य अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
