Pune Crime News | आयएल एस विधी महाविद्यालयात रॅगिंगची घटना; तरुणाच्या चिकाटीने तब्बल दीड वर्षांनंतर 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | दारु पित असल्याची टिप वॉचमनला दिल्याने त्याने व्हिडिओ काढला, या संशयावरुन आय एल एस विधी महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांचे सामुहिक रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कॉलेजची बदनामी होऊ नये, यासाठी कॉलेज प्रशासनाने कोणतेही सहकार्य न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिडित तरुणाने केला आहे.
आदित्य सिंग (वय २०), सुमीत गायकवाड (वय २०), राजवंश देशमुख (वय २०), स्वराज गायकवाड (वय २०), उज्वल राज (वय २०, सर्व रा़ आय एलएस कॉलेज मुलांचे वसतीगृह, लॉ कॉलेज रोड) यांच्यावर महाराष्ट्र रॅगिंग अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आय एल एस कॉलेज मुलांचे वसतीगृहात ६ ऑक्टोंबर २०२४ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा सध्या लॉ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला शिकत असून आरोपी मुलेही द्वितीय वर्षाला शिकत आहे. त्यांची येत्या २८ एप्रिलपासून परीक्षा सुरु होत आहे. आरोपी विद्यार्थी हे दारू पित बसले असताना वॉचमनने त्यांचा व्हिडिओ काढला होता. वॉचमनला या पिडित तरुणाने टिप दिली, त्यामुळेच वॉचमनने व्हिडिओ काढल्याचा संशय या आरोपींना होता. आपण वॉचमनला टिप दिली नाही, असे पिडित तरुणाने सांगितल. तरीही ते त्याला त्रास देत होते. रात्री वसतीगृहाची लाईट बंद करुन त्यांना सामुहिक वाईट शिवीगाळ करायचे. त्यांच्या दरवाजावर अंडी फोडायचे, दरवाजाची काचही त्यांनी फोडली होती. याबाबत पिडित तरुणाने कॉलेजचे प्राचार्य तसेच प्रशासनाकडे तक्रार केली होती. परंतु, त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. त्यानंतर त्यांनी यु जी सी कडे तक्रार केली. यु जी सी ने कॉलेजला चौकशी करण्यास सांगितले.
महाराष्ट्र रॅगिंग अधिनियमानुसार, रॅगिंग झाल्याची तक्रार आल्यानंतर २४ तासात त्यात तथ्य आहे की नाही, याचा प्राथमिक तपास करावा. तसेच ७ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करावी, असे म्हटले आहे. तरीही कॉलेजच्या प्रशासने कोणतीही गंभीर पणे चौकशी केली नाही. उलट आपल्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला, असा पिडित तरुणाने आरोप केला आहे.
या पिडित तरुणाने सांगितले की, आपल्या कॉलेजची बदनामी होऊ नये, कॉलेज प्रशासनाने असे काही प्रकार झाला नसल्याचे कळविले. त्यानंतर आपण अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त त्यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत सांगितल्यावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे या पिडित तरुणाने सांगितले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत. २००३ मध्येही आयएलएस विधी महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार घडला होता. तेव्हा महाविद्यालयाने २६ विद्यार्थ्यांना निलंबित केले होते. तसेच २०१० मध्ये रॅगिंगच्या एका प्रकरणामुळे एका विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले होते.
