Pune Crime News | चोरी केली म्हणून काढून टाकलेल्या चालकाने मालकाच्या आईच्या सोन्याच्या दागिन्यांची केली चोरी, विमानतळ पोलिसांनी केले 15 लाखांचे दागिने हस्तगत
पुणे : Pune Crime News | घरातून व गाडीतील बॅगमधील पैसे चोरल्याने काढून टाकलेला चालक मालकाच्या आईला भेटायला येत होता. साखरपुड्याला जाण्यासाठी आईने त्याला बोलावून घेतले असताना तिला हॉलवर सोडून चालकाने घरात शिरुन सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. विमानतळ पोलिसांनी या चालकाला अटक केली असून १५ लाख रुपयांचे दागिन्यांची लगड हस्तगत केली आहे.
राजेश परशुराम कांबळे Rajesh Parashuram Kamble (वय ४०, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत फारुख अब्दुल हमीद हमदुले (वय ५७, रा. कोनार्क कॅम्पस, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची हमदुले इंजिनिअर्स नावाची भोसरी एम आय डी सी मध्ये कंपनी आहे. त्यांच्याकडे राजेश कांबळे हा चालक म्हणून कामाला होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याने घरातून व गाडीतील बॅगमधील पैशांची चोरी केली होती. त्यावेळी राजेश कांबळे याला कामावरुन काढून टाकले होते. परंतु तो अधुन मधून त्यांच्या आईला भेटण्यासाठी येत होता.
फिर्यादी यांच्या भाचीचा साखरपुडा ५ एप्रिल २०२६ रोजी बंडगार्डनमधील हॉलमध्ये होता. आईने कार्यक्रमासाठी राजेश कांबळे याला बोलविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे राजेश कांबळे हा आईला घरुन घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणाहून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तो मुलाची तब्येत बिघडली असे सांगून गाडी तेथेच ठेवून गेला होता. घराची एक चावी ही नेहमी गाडीच्या चावीला असायची.
त्यानंतर फिर्यादी यांच्या आईने १९ एप्रिल रोजी कपाटामधील सोन्याचे दागिने ठेवण्यास देते, असे म्हणून कपाट उघडले. त्यात दागिने नव्हते. त्यांनी आईला विचारले की, दागिने शेवटे कधी पाहिले होते. तिने साखरपुड्याच्या दिवशी असे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांच्या लक्षात आले की, आईला कार्यक्रमाला सोडायला आल्यानंतर मुलाची तब्येत बरी नाही, असे सांगून तो निघून गेला होता. त्यांनी सोसायटीच्या कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर, राजेश कांबळे हा त्या दिवशी सव्वा आठच्या सुमारास त्यांच्या सोसायटीमध्ये जिन्याने वर जात असताना दिसला. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी परत जाताना दिसला. त्यांना संशय आला की, आईचे दागिने राजेश कांबळे यांनी चोरले आहेत. त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
घरी चालक म्हणून काम करणार्या राजेश कांबळे यानेच चोरी केली होती. पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे व लालु कर्हे यांना राजेश कांबळे याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चोरी केल्याची त्याने कबुली दिली. चोरी केलेले १५ लाख रुपयांचे दागिने वितळवुन त्याची लगड तयार केली होती. पोलिसांनी ती लगड जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कर्हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार यांच्या पथकाने केली आहे.
