Pune Crime News | मानसिक रुग्णाने 3 किलोमीटर पीएमपी बस पळविली, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली (Video)
पुणे : Pune Crime News | पीएमपी बसचालकाने सीएनजी संपत आल्याने बसला चावी तशीच ठेवून दुसरी बस घेऊन गेला होता. तेव्हा एका मद्यपीने या बसला सुरु करुन सुसाट नेऊ लागला. शिवाजीनगर येथील डेंगळे पुलापासून तो बालगंधर्व रंगमंदिर येथून जंगली महाराज रोडने थेट गुडलक हॉटेल येथील गोखले स्मारक चौकापर्यंत आला. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी बस अडविल्याने पुढील अनर्थ टळला.
गोपालसिंग राणा (वय २०, मुळ रा. उत्तराखंड) असे या तरुणाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणती अप्रिय गोष्ट घडली नाही.
गोपालसिंग राणा हा मानसिक रुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तो नुकताच उत्तराखंड येथून पुण्यात आला होता. तो फिरस्ता आहे. त्याला बोललेले काही समजत नाही. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रविवारी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे.
पीएमपीच्या न ता वाडी आगाराची वैष्णवी कंपनीच्या ठेकेदाराची बस आहे. ती मार्ग क्रमांक १३५/१ वाघोली ते महापालिका भवन या मार्गावर धावते. पीएमपी बस दुपारी महापालिका भवन येथील स्थानकात आली. बसमधील सीएनजी संपत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने ते बस तेथेच डेंगळे पुलावर उभी केली. चावी स्टेअरिंगजवळ तशीच ठेवली. त्याने कंपनीच्या अधिकार्याला ही बाब सांगितले. त्यानंतर तो दुसरी बस घेऊन निघून गेला. गडबडीत बसची चावी गाडीला लावली असल्याचे तो विसरुन गेला. बसमध्ये कोणी नसल्याची संधी उत्तराखंडमधील तरुणाने साधली. त्याने बस सुरू केली. महापालिका भवन, जंगली महाराज रस्ता तेथून तो विरुद्ध दिशेने गोखले स्मारक चौकाकडे निघाला. त्यावेळी बस पळवून नेली असल्याचे गोखले स्मारक येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी विरुद्ध दिशेने येत असलेली बस पाहून ती अडविली. बस थांबताच पोलिसांनी अक्षरश झडप घालून चालकाला ओढून बाहेर काढले. त्याच्यावर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
