Bal Mane | उमेदवारी माघारीनंतर बाळ मानेंचे दोन व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत; ठाकरे गटाकडून हकालपट्टी तर महायुतीची सरशी
मुंबई : Bal Mane | कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या असून, महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) उमेदवार बाळ माने यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यासाठी बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले तेव्हा त्यांच्यासोबत भाजपचे आमदार नितेश राणे उपस्थित होते.
मानेंच्या या अनपेक्षित माघारीमुळे महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) उमेदवार आणि सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची निवड बिनविरोध झाली. बाळ मानेंच्या या पाऊलामुळे ठाकरे गटात प्रचंड संताप असून, पक्षाने तात्काळ कारवाई करत त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून या कारवाईची माहिती दिली, तर माजी खासदार विनायक राऊत यांनी बाळ मानेंचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
या राजकीय भूकंपानंतर आज बाळ माने यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवलेले दोन स्टेटस संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या पहिल्या स्टेटसमध्ये, “मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो, त्याचवेळी त्या दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम (बदला घेणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे),” असे लिहिले आहे.
या मार्मिक ओळींमधून त्यांनी ठाकरे गटातील अंतर्गत अविश्वास आणि वादावर बोट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसऱ्या स्टेटसद्वारे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे, ज्यामुळे ते पुन्हा एकदा भाजप किंवा महायुतीच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. बाळ मानेंच्या या माघारीमुळे कोकणासह राज्यातील पाचही विधान परिषद जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
