Pune Crime News । जमिनीची परस्पर विक्री करुन उद्योगपती रवींद्र साकला यांची साडेपाच कोटींची फसवणूक, सुभाष दुगड, राजेंद्र दुगडसह 5 जणांना अटक
पुणे : Pune Crime News । न्यायालयात दावा चालू असताना लोहगाव येथील एक हेक्टरपैकी ४८ आर जमिनीची कोणतीही संमती न घेता परस्पर विक्री करुन ५ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
याबाबत रवींद्र नौपातलाल साकला (वय ६३, रा. आर एन एस अॅलेक्झांड्रा रोड, घोरपडी) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुभाष उत्तमचंद दुगड Subhash Uttamchand Dugad, राजेंद्र उत्तमचंद दुगड Rajendra Uttamchand Dugad (रा. बिबवेवाडी) संदेश अशोक भन्साळी Sandesh Ashok Bhansali (रा. खेड), शेख उमर लतीफ इनामदार Sheikh Umar Latif Inamdar, भास्कर रेड्डी Bhaskar Reddy, नारायण कल्लरी रेड्डी Narayan Kallari Reddy (रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार लोहगाव येथील सर्वे नंबर १६३, हिस्सा नंबर ८/१अ/२ एकूण क्षेत्र १ हेक्टर ८ आर पैकी ४८ आर येथे व वेगवेगळ्या शासकीय दुय्यम निबंधक कार्यालयात २०१० ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र साकला हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची लोहगाव येथे जमीन आहे. आरोपी सुभाष दुगड, राजेंद्र दुगड व इतरांनी या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांचा न्यायालयात दावा चालू आहे. असे असताना आरोपींनी आपसात कट रचून साकला यांची कोणतीही संमती न घेता जमिनीची परस्पर विक्री केली. त्याचे ५ कोटी ७० लाख रुपये स्वीकारुन फिर्यादी यांना आर्थिक नुकसान पोहचवुन फसवणूक केली आहे. लोहगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.
