Pune Crime News । बनावट पदवी प्रमाणपत्रप्रकरणी विद्यापीठाच्या लेखा कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल, रिक्षाचालकाला दिले बी कॉम चे बनावट गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र

Pune Crime News

पुणे :  Pune Crime News ।  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी कॉम या पदवीचे बनावट प्रमाणपत्र उपलब्ध करुन देऊन ७० हजार रुपये घेणार्‍या विद्यापीठातील लेखा कर्मचार्‍याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रमेश दामोदर मुखेकर (वय ४८, रा. सुरज अपार्टमेंट, शिंदेनगर, जुनी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे (वय ५२, रा. सिंहगड रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मार्च २०२६ ते १ जुलै २०२६ दरम्यान घडला आहे.

पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश मुखेकर याने साहिल कदम या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या बी कॉम या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक तसेच पदवी प्रमाणपत्र मिळवुन देतो, असे सांगून ७० हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारले होते. तसेच व्हॉटसअ‍ॅपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मुळ कागदपत्रासारख्या भासणार्‍या प्रती दिल्या होत्या. रिक्षाचालकाने ही तक्रार केल्यानंतर गेल्या आठवड्यात विद्यापीठाने सत्यशोधन समिती स्थापन केली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार रमेश मुखेकर हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत नाही, तसेच त्याने व्हॉटसअ‍ॅपवर तयार करुन दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नाहीत, असे दिसून आले. मुखेकर याने पैसे स्वीकारुन गैरकृत्यात सहभाग घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाने त्याला निलंबित केले.
याप्रकरणात सखोल तपासाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने डॉ. राजेंद्र तलवारे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रमेश मुखेकर याने एकालाच बी कॉम पदवीधर झाल्याचे बनावट गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र तयार करुन दिले की आणखी कोणाला असे बनावट प्रमाणपत्रे तयार करुन दिली, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे करीत आहेत.

You may have missed