Pune Cyber Crime । सायबर गुन्हेगारांना बँक खाते पुरविणार्‍या १३२ म्यूल खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल, १५२ आरोपींना अटक

Pune Cyber ​​Crime News

देशव्यापी ‘ऑपरेशन म्यूल हंट’ मोहिमेत पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : Pune Cyber Crime । सायबर गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी त्यांना फसवणूक करण्यासाठी म्यूल बँक खाते काढून मदत करणार्‍यांना आळा घालण्यासाठी देशभरात ‘ऑपरेशन म्यूल हंट’ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या सायबर गुन्हेगारांची कोंडी करण्यासाठी त्यांना बँक खाते पुरविणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा १३२ म्यूल खातेदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून १५२ जणांना अटक केली आहे.

म्यूल बँक खाते म्हणजे काय

एखाद्या संस्थेच्या, कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून त्यामध्ये सायबर फसवणुकीतून येणारा पैसे स्वीकारण्यास संमती दिली जाते. सायबर गुन्हेगार हे बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगतात. फसवणुकीचा हा पैसा खात्यात जमा झाला की बॅक खातेदाराला किंवा स्वत: हा पैसा इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करतात. त्यामुळे पुढे हा पैसे कोठे गेला हे समजणे अवघड जाते. केवळ नाममात्र कमिशनपोटी अनेक जण अशी बँक खाती काढून ती सायबर गुन्हेगारांना वापरण्यास देतात. त्या बँक खात्यांना म्यूल खाते म्हटले जाते.

पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १३२ म्यूल खातेधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे १५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. समन्वय पोर्टलद्वारे इतर राज्यांकडून प्राप्त १७०५ नोटिसांवर कार्यवाही सुरु असून संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहरातून इतर राज्यातील म्यूल खातेधारकांना २०९९ नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यावर पुढील कार्यवाही सुरु आहे.

तपासादरम्यान पुणे, मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर राज्यांमधील आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तपासाची व्याप्ती

सायबर पोलीस म्यूल खातेधारकांचे आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल व्यवहार, बँक व्यवहार तसेच सायबर गुन्हेगारांशी असलेले संबंध यांचा सखोल तपास करीत आहेत. म्यूल खातेधारकांमुळे सायबर गुन्हेगारांना आर्थिक मदत मिळत असल्याने अशा व्यक्तीनाही सहआरोपी म्हणून कारवाई केली जात आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वत:चे बँक खाते अनोळखी व्यक्तीस वापरण्यास देऊ नये, एटीएम कार्ड, चेक बुक, नेट बँकिंगची माहिती किंवा ओटीपी शेअर करु नये़ सीमकार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे केल्यास संबंधित व्यक्तीवर सायबर गुन्ह्यात सहआरोपी म्हणून कायदेशीर कारवाई होऊ शकते.

देशभरातील सर्व राज्यांमध्ये ही मोहिम हाती घेण्यात आली आहे़ म्यूल बँक खाते चालवणाऱ्याना पकडून या खात्यात जमा झालेले पैसे वसुल करणे, त्यांनी या बँक खात्यातील पैसे पुढे कोणाकडे पाठविले़ त्याची माहिती घेऊन त्यांचा शोध घेऊन फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मिसाळ यांनी सांगितले.

You may have missed