Pune Crime News | 21 गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार जामिनावर सुटला; दुसर्या दिवशी ज्येष्ठ नागरिकाला पकडून जबरदस्तीने खिश्यातील रक्कम नेली चोरुन, काळेपडळ पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | चोरी, जबरी चोरीचे २१ गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार ३ ऑगस्ट रोजी तुरुंगातून सुटला. दुसर्या दिवशी ४ ऑगस्ट रोजी या गुन्हेगाराने ज्येष्ठ नागरिकाला पकडून जबरदस्तीने त्याच्या खिशातून १७ हजार रुपये चोरुन नेले़. काळेपडळ पोलिसांनी या गुन्हेगाराला पुन्हा जेरबंद केले आहे.
अस्लम ईस्माईल शेख Aslam Ismail Shaikh (वय २७, रा. नवीन म्हाडा, ससाणेनगर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत संजय अर्जुन काळे (वय ६७, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना काळेपडळमधील चेतन स्वीट दुकानासमोरील आनंदी विहार बिल्डिंगजवळ ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जात असताना अस्लम शेख हा एका अल्पवयीन मुलाला दुचाकीवरुन घेऊन आला. त्यांनी फिर्यादी यांना जाणीवपूर्वक धक्का मारला. सॉरी बोलत असताना तुमचा पाय उचलतो, असे बोलून त्याने फिर्यादी यांचे पाय पकडले. जबरदस्तीने त्यांच्या खिश्यात हात घालून खिशातील १७ हजार रुपये चोरुन नेले़ काळेपडळ पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी अस्लम शेख याला अटक केली. अल्पवयीन मुलाच्या गाडीवरुन ते आले होते. ती दुचाकी व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.
