Pune Accident News | कारचा दरवाजा अचानक उघडल्याने भीषण अपघात; फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
पुणे : Pune Accident News | मागून वाहन येत असल्याची खात्री न करता कारचा दरवाजा उघडल्यामुळे झालेल्या अपघातात फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हडपसर परिसरातील डी. पी. रस्त्यावर १७ जुलै रोजी ही घटना घडली.
मार्फत फकीर अली (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक रज्जाक लालासाहेब नदाफ Razzak Lala Saheb Nadaf (वय ३०, रा. पारखे वस्ती, सुसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा भाऊ अब्दुल सलाम फकीर अली (वय ३२, रा. आसाम) याने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्फत अली हा फूड डिलिव्हरी कर्मचारी म्हणून काम करत होता. १७ जुलै रोजी दुपारी सुमारे तीन वाजता तो हडपसरमधील डी. पी. रस्त्यावरून जात होता. मल्हार हॉटेलसमोर कारचालकाने मागून वाहन येत असल्याची खात्री न करता अचानक कारचा दरवाजा उघडल्याचा आरोप आहे.
कारचा दरवाजा अचानक समोर आल्याने मार्फत याची दुचाकी दरवाजाला जोरात धडकली आणि तो रस्त्यावर कोसळला. अपघातात त्याच्या खांद्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार आर. बी. गायकवाड करीत आहेत.
