Backstage Hotel & Pub Incident | पबमध्ये DJ चा व्हिडिओ काढणार्‍या तरुणाला स्टाफने धमकावले; तेथून निघून जाण्यास सांगून टोळक्याने मारहाण करुन केले फ्रॅक्चर  

Pune Crime News

पुणे : Backstage Hotel & Pub Incident | रात्री जेवण झाल्यानंतर डि जे चा व्हिडिओ काढणार्‍या तरुणाला पबच्या स्टाफने व्हिडिओ काढू नको, आता इथून निघ नाही तर खूप मार खाशील असे धमकावले. पार्किंगमध्ये ५ जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण करुन फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत हर्षल कैलास कदम (वय ३७,  रा. श्रीनाथ अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सिन्नरकर, अक्षय व त्याच्या २ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगरमधील बॅक स्टेज हॉटेल व पबच्या  पार्किंगमध्ये २ ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल कदम यांच्यावर भोसरीतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ते खडकीतील कंपनीत केमिकल प्लॅन्टवर ऑपरेटर म्हणून काम करतात. ते व त्यांचे मित्र ज्यु मॅनेजर श्रीकांत कोळापे (रा. बोपखेल) हे १ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता जेवणासाठी बॅक स्टेज हॉटेल व पब (Backstage Hotel & Pub) येथे गेले होते. तेथून दीड वाजता जेवण झाल्यावर ते मोबाईलमधून डी जे चा फोटो व व्हिडिआ काढत होते. तेथील डी जे जवळील स्टाफ सिन्नरकर याने तु व्हिडिओ व फोटो काढु नको, आता इथुन निघ ,नाही तर खुप मार खाशील, अशी धमकी दिली. त्यानंतर ते दोघे खाली पार्किंगमध्ये गेले. तेथे अक्षय नावाचा मुलगा आला व तो फिर्यादी यांना म्हणाला तू जा नाही तर तुला लय ठोकेल, अशी धमकी दिली. त्यावर फिर्यादी यांनी पार्टी  आता संपली आहे.

मी लगेच का जाऊ असे म्हटल्याने अक्षय याने फिर्यादी यांच्या डोक्यावर एक फटका मारला. इतर चार मुले तेथे आली. त्यावेळी सिन्नरकर नावाच्या मुलाने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादी यांच्या दोन्ही हातावर, पायावर रॉडने मारहाण केली. काहींनी श्रीकांत कोळापे याच्याकडे धावून जाऊन त्यालाही रॉडने गुडघ्यावर फटके मारले. तेथून ते पळून बाहेर आले. तेथील दोन मुलांनी त्यांची दुचाकी आणून दिली. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या डाव्या पायाचा घोट्याला सुज येऊन उजवा डोळा लाल झाल्याने ते मेडिकवर हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी एक्स रे व सीटी स्कॅन करुन त्यांच्या डाव्या पायाचा घोट्याला फ्रॅक्चर  असल्याचे सांगून त्यावर सर्जरी करावी लागेल, असे सांगून पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन फिर्याद घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

You may have missed