Pune Crime News | सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिला वकीलालाच ‘डिजिटल अरेस्ट’ ची धमकी देऊन 70 लाखांची केली फसवणूक

Cyber Crime AI

पुणे : Pune Crime News | ‘डिजिटल अरेस्ट’ हा एक फ्रॉड आहे. अटक करण्याची अशी कोणतीही पद्धत कायद्यात नाही, असे सातत्याने सांगितले जाते. तरीही ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना सायबर चोरटे फसवतात. त्यांच्या जाळ्यात एक ज्येष्ठ महिला वकीलही आली. सायबर चोरट्यांनी तिची ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत पिसोळी येथील ६८ वर्षाच्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़  हा प्रकार ५ ते ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ५ ऑगस्ट रोजी महिला वकिलांच्या मोबाईल वर संपर्क साधला.

सायबर चोरट्यांनी स्टेट बँकेतून बोलत असल्याची बतावणी  त्यांच्याकडे केली. तुमच्या नावाने क्रेडिट कार्ड असून त्यावर १ लाख ९ हजार ६९९ रुपयांचे व्यवहार गुन्हेगारांसोबत झाले असून चोरी, मनी लॉड्रिंग, मानवी तस्करी या गुन्ह्यांमध्ये तुमचे नाव जोडण्यात आले आहे. या प्रकरणात ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येणार आहे, अशी धमकी त्यांना देण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे द्यावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर महिलेने चोरट्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या खात्यात तीन दिवसांत वेळोवेळी ७० लाख रुपये जमा केले. चौकशी केल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संगिता देवकाते तपास करीत आहेत.

You may have missed