Pune Crime News | भाडेकरुंची माहिती न देणार्‍या 113 घरमालक, पीजी चालकांवर पुणे पोलिसांनी केले गुन्हे दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुणे शहराची सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्याकरीता पुणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली जात असून त्यामध्ये भाडेकरुंची माहिती न देणार्‍या ११३ घरमालक, पीजी चालकांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे शहरात शिक्षण, नोकरी व व्यवसायाकरीता मोठ्या प्रमाणावर परराज्यातून तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने नागरिक शहर व आजूबाजूच्या परिसरात सोसायटी, बैठ्या चाळी तसेच इतर ठिकाणी भाडे तत्वावर, पी जी, कॉट बेसीसवर राहत असतात. अशा भाडेकरुंसोबत कायदेशीर भाडेकरार करणे बंधनकारक असताना बरेच घरमालक/ पी जी चालक बेकायदेशीरपणे भाडेकरु ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ़ प्रशांत अमृतकर यांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

या मोहिमेमध्ये विशेष शाखेकडील परिमंडळ १ ते ७ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील घर, सदनिका भाडेतत्वावर देणार्‍या घरमालक व भाडेकरु यांची माहिती घेऊन संबंधितांनी भाडेतत्वावर राहण्यासाठी भाडेकरार केला आहे का याची पडताळणी करुन जर कोणी विनाभाडेकरार अगर पोलीस ठाण्यात माहिती न कळविता रहात असेल तर संबंधित घरमालक यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम कलम १६३ चे उल्लंघन केल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.

आयजीआर (ई सरीता) प्रणालीमध्ये नागरिकांनी ऑनलाईन भरलेली ई लिव्ह अँड लायसन्स ची माहिती सीसीटीएनएस संगणक प्रणालीद्वारे उपलब्ध होते़ तसेच पुणे पोलीस डॉट इन वेबसाईट वर कळवा  भाडेकरु विनंती या सुविधेद्वारे घरमालकाने भाडेकरुची माहिती पोलीस ठाण्यास ऑनलाईन कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे घरमालक/पीजी चालक यांनी भाडेकरुंची माहिती न चुकता संबंधित पोलीस ठाण्यात देण्याबाबत पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे.

पुणे शहरातील कोथरुड, डेक्कन, आंबेगाव, चतु:श्रृंगी, खडकी, लोणीकंद, लोणी काळभोर व इतर भागात अधिक तीव्रतेने ही मोहिम राबविली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ़ प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

You may have missed