Pune Crime News | गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील 1 वर्षांपासून फरार असलेल्या मोक्कामधील शार्प शुटरसह दोघा गुन्हेगारांना कोथरुड पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | गोळीबार करुन दहशत निर्माण केल्याप्रकरणी गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर २ मोक्का कारवाया करण्यात आल्या आहेत. यामधील १ वर्षांपासून फरार असलेल्या शार्प शुटरसह दोघा गुन्हेगारांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे़
संतोष अनंत धुमाळ Santosh Anant Dhumal (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरुड) आणि विपुल उत्तम माझिरे Vipul Uttam Majhire (वय ३०, रा. रावडे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ विपुल माझिरे हा शार्प शुटर म्हणून ओळखला जातो.
नीलेश घायवळ याने आपल्या टोळीतील गुंडांना टोळीचे वर्चस्व वाढविण्यास सांगितले होते. त्यातून गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार करुन तरुणाला जखमी केले होते. तसेच एकावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही गुन्ह्यामध्ये घायवळ टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. त्यातील काही गुंड अजूनही फरार आहेत. कोथरुड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस हवालदार लांडगे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संतोष धुमाळ हा पत्नीला भेटण्यासाठी कोथरुड गावठाण येथे येणार आहे. या बातमीची खातरजमा करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके व त्यांच्या सहकार्यांनी वेगवेगळ्या टीम करुन कोथरुड गावठाण येथील गुलमोहर सोसायटीत पोहचले. काही जण सोसायटीचे आत व बाहेर जाणार्या मार्गावर तसेच लिफ्टचे ठिकाणी अधिकारी व अंमलदार थांबले. त्यानंतर एक पथक सोसायटीमधील फ्लॅट चेक करु लागले. त्यावेळी एका फ्लॅटमधून आरोपी पळताना दिसला. तो खिडकीतून बाहेर पळण्याचा प्रयत्न करत असताना संतोष धुमाळ याला पकडले.
संतोष धुमाळ याच्याकडे विपुल माझिरे याची चौकशी केल्यावर त्याने विपुल माझीरे हा त्याला भेटण्यासाठी बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले या दुकानाच्या मागे भेटायला येणार आहे. या माहिती नुसार पोलिसांनी जोशी वडेवाले यांच्या दुकानाच्या मागे सापळा रचला. काही वेळात विपुल माझिरे संतोष धुमाळ याला भेटायला आला. पोलिसांनी त्याला पकडून सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ़ सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, सुनिल कारोटे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले, पोलीस हवालदार लांडगे, पठाण, सोनावणे, दगडे, लोखंडे, पोलीस अंमलदार पांढरे, शिर्के, डोंगरे, जमदाडे यांनी केली आहे.
