Pune Crime News | पत्नीला नांदविण्यास न पाठविल्याने 70 वर्षाच्या सासर्यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; चुत:श्रृंगी पोलिसांनी जावयाला केली अटक
पुणे : Pune Crime News | दारु पिऊन भांडण करीत असल्याने पत्नी माहेरी निघून आली. तिला पुन्हा नांदविण्यास पाठविण्यास नकार दिल्याने जावयाने ७० वर्षाच्या सासर्यावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चतु:श्रृंगी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन जावयाला अटक केली आहे.
मधुकर गंभीर हडकमोल Madhukar Gambhir Hadkamol (वय ४५, रा. अमोदा, ता. यावला, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. दत्तात्रय भिमाजी विटकर (वय ७०, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे.
त्यांच्यावर लोकमान्य हॉस्पिटलमधील अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत त्यांचा मुलगा शशिकांत दत्तात्रय विटकर (वय ४०) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील कॅनॉल रोडवरील सुदर्शन हौसिंग सोसायटीमध्ये बुधवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण हिचा मधुकर हडकमोल याच्याबरोबर ८ वर्षापूर्वी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. मधुकर याला दारुचे व्यसन असून तो सतत तिच्याबरोबर भांडण करत असतो. या रोजच्या भांडणाला कंटाळून ति आपल्या दोन मुलांना घेऊन मागील ४ महिन्यांपासून माहेरी वडारवाडी येथे रहायला आली आहे. तिचे पती मधुकर हे सतत तिला फोन करुन तु जळगावला ये, असे म्हणून फोनवरुन त्रास देत असत. जुलै २०२६ मध्ये मधुकर हे वडारवाडीतील घरी आले होते, असे हे बहिणीने फिर्यादी भावाला सांगितले. त्यांनी मधुकर यांना फोन करुन सांगितले की, तुम्ही दारु सोडा़ पुण्यात या, तुम्हीला येथे काम शोधून देतो, असे फिर्यादी यांनी सांगितले. परंतु ते कोणाचे काही ऐकत नव्हते.
१२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी मधुकर याने आपली पत्नी हिला फोन करुन कळविले की, तू आणि तुझा बाप जिवंत राहणार नाही, असे म्हणून फोन कट केला. तिने हे आपल्या भावाला सांगितले. पण, मधुकर नेहमी धमकी देत असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. दत्तात्रय विटकर हे मॉडेल कॉलनीतील सुदर्शन सोसायटी येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मधुकर तेथे गेला. त्याने कोयत्याने दत्तात्रय विटकर यांच्या गालावर व डाव्या हाताच्या दंडावर वार केले. यामध्ये दत्तात्रय विटकर बेशुद्ध पडले. डॉ. चैतन्य दीक्षित यांनी त्यांना तातडीने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार करण्यात आले आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनेनंतर ५ तासाच्या आत मधुकर हडकमोल याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.
