Pune Crime News | ज्येष्ठाचे अपहरण करुन सांगलीमध्ये नेऊन खुन करुन टेंभू कॅनॉलमध्ये दिले फेकून; पोलिसांनी तिघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | ५९ वर्षाच्या ज्येष्ठाचे अपहरण करुन त्याला सांगली येथे घेऊन जाऊन त्याचा खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कडेगाव येथील टेंभू कॅनॉलमध्ये वाहत्या पाण्यात टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
गोविंद माधवराव उपासे (वय ५९, रा. तपोधाम सोसायटी, वारजे माळवाडी) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. तातोबा ऊर्फ वैभव अर्जुन केंगार Tatoba alias Vaibhav Arjun Kengar (वय २८, रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), राहुल राजेंद्र बाबर Rahul Rajendra Babar (वय २५, रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), रोहन जयसिंग सावंत Rohan Jaysing Sawant (वय २३, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रोहित गोंविद उपासे (वय ३५, रा. तपोधाम सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद उपासे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. गोंविद उपासे हे ९ ऑगस्ट रोजी रात्री मित्रांबरोबर जेवण करण्यासाठी धायरी येथील महादेवनगर येथे गेले होते. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता त्यांना कोणाचातरी फोन आला. तेव्हा सोबतच्या मित्रांना बाहेर जाऊन येतो, असे सांगून ते त्यांच्या दुचाकीवरुन निघून गेले. गोविंद उपासे हे पुन्हा परत आले नाहीत, म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा जयवंत यास सांगितले. त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गोविंद उपासे यांची मिसिंगची तक्रार ११ ऑगस्ट रोजी दिली होती. गोविंद उपासे यांचे बँक स्टेटमेंट काढण्यात आले. तेव्हा त्यांनी दुसर्या दिवशी सांगली येथील एका एटीएममधून ११०० रुपये काढल्याचे दिसून आले.
१२ ऑगस्ट रोजी सांगली शहर पोलीस यांना सांगलीतील शामरावनगर येथील घोड्याचा तबेला येथे काही जणांची भांडणे चालू असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरुन सांगली शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गोविंद उपासे यांचे अपहरण करुन त्यांना सांगलीत आणले. आम्ही मारहाण करुन त्यांचा मृतदेह कडेगाव येथील कॅनॉलमध्ये टाकून दिल्याचे सांगितले. तसेच त्यांची दुचाकी आंबेगाव येथे लावली आहे, अशी माहिती दिली. गोविंद उपासे यांचा शोध घेत असताना कडेगाव येथे त्यांचा मृतदेह आढळून आला़ याची माहिती नांदेड सिटी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी गाडी लावलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तिघे जण गोविंद उपासे यांना चारचाकीमधून घेऊन जाताना दिसत होते़ त्यानंतर हा गुन्हा आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला़ अनैतिक संबंधाच्या संशयावरुन हा खुन करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
