Pune Crime News | ‘अभी बिल मांग के दिखा, मै पैसा नही दुंगा, तेरे को ही मुझे हर महिना 10 हजार देना पडेगा’ ! एमजी रोडवरील हॉटेलमध्ये तोडफोड करुन खंडणी मागणाऱ्या गुंडाला लष्कर पोलिसांनी केले अटक
पुणे : Pune Crime News | एम जी रोडवरील कोहिनूर हॉटेलमध्ये गुंडाच्या टोळीने जेवण केले. त्याचे १ हजार रुपये बिल झाले असताना केवळ २०० रुपये देऊन वेटरला इतनी ही तेरी लायकी है, असे गुंडांचा म्होरक्या म्हणाला. वेटरने उरलेल्या बीलाची मागणी केल्यावर त्याला हत्याराचा धाक दाखवुन आता तुच मला दर महा १० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करुन धमकावले. हॉटेलमधील काचेचे ग्लास फोडून नुकसान करत दहशत पसरवली. लष्कर पोलिसांनी एका गुंडाला अटक केली आहे.
परमजीत प्रेमचंद मेहरा Paramjit Premchand Mehra (वय ३५, रा. न्यू मोदीखाना, फकीर मोहम्मद चाळ, कॅम्प) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. शहबाज शेख (रा. ताबुत स्ट्रिट, महानाज हॉटेलच्या मागे, कॅम्प) व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कॅम्पमधील एम जी रोडवरील कोहिनूर हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत रेहमान अब्दुला शेख (वय ४१, रा. लांडगे निवास, सदगुरुनगर, भोसरी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाज शेख व परमजीत मेहरा यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. शहबाज शेख हा कॅम्प भागात दहशत पसरवित असतो. तो आपल्या ५ मित्रांना घेऊन सोमवारी सायंकाळी कोहिनूर हॉटेलमध्ये गेला. त्याचे जेवणाचे बिल १ हजार रुपये झाले होते. वेटरने बिल दिल्यावर त्याने २०० रुपये देऊन इतनी ही तेरी लायकी है, असे म्हणाला. वेटरने उरलेल्या बीलाची मागणी केली. तेव्हा त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. शहबाज शेख याने त्याच्याकडील हत्याराचा धाक दाखवुन ‘‘अभी बील मांग के दिखा, अभी मै पैसा नही दुंगा, तेरे को ही मुझे हर महिना दस हजार देना पडेगा, नही तो मै तेरे को जान से मार दुंगा’’असे म्हणाला. त्याच्या साथीदारांनी त्यांच्या जवळील कमरेचा पट्टा बीलाच्या टेबलावर मारुन दमदाटी केली. हॉटेलमधील काचेचे ग्लास फोडून नुकसान केले. त्यांच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर हॉटेलमध्ये गर्दी जमु लागल्याने ते दुचाकींवरुन पळून गेले. लष्कर पोलीस तपास करीत आहेत.
