Pune Crime News | मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या ‘सेव्हन’ स्पावर छापा; लोखंडी शिडीवरुन पोलिसांनी केला आत प्रवेश, स्पाचालक, मॅनेजरसह दोन महिला पत्रा उचकटून गेल्या पळून, दोन महिला ताब्यात
पुणे : Pune Crime News | मसाजच्या नावाखाली स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी SEVEN स्पावर छापा टाकला.दरवाजा बंद असल्याचे पाहून पोलीस हवालदाराने लोखंडी शिडीवर चढून आत प्रवेश केला. पोलीस आल्याचे समजताच स्पाचा चालक व मॅनेजर हे पत्रा उचकटून पळून गेले. पोलिसांनी तेथील दोन महिलांची सुटका केली.
स्पाचालक कपिल ऊर्फ काफिल उद्दीन आणि स्पा मॅनेजर असिफ यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हडपसरमधील डी पी रोडवर सेवन स्पा असून त्याठिकाणी स्पाचालक कपिल हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता मॅनेजर असिफ मार्फत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची बातमी हडपसर पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला स्पावर पाठवले. बनावट ग्राहकाने इशार्याचा मेसेज करताच पोलिसांनी स्पावर छापा टाकला. त्यावेळी स्पाचे मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलीस हवालदार लोणकर हे स्पाचे पश्चिम भिंतीला लावलेल्या लोखंडी शिडीने वरती चढून आत प्रवेश केला. त्यावेळी स्पाचा चालक व मॅनेजर तसेच दोन पिडित महिला यांनी स्पाच्या भिंतीस असलेल्या जागेमधून बाहेर उडी मारुन मोकळ्या जागेतून पळून गेले. आत प्रवेश केलेल्या हवालदार लोणकर यांनी आतील बाजुला लावलेले लॉक तोडून शटर उघडले. त्यावेळी पोलिसांनी आत प्रवेश केला.
आत प्रवेश केल्यानंतर पोलीस जिन्याने पहिल्या मजल्यावर पोहचले. तेथे बनावट ग्राहक होता. त्याने सांगितले की, मॅनेजर व स्पाचा स्टाफ हे भिंतीचा पत्रा उचकटून पळून गेले. तेथे असलेल्या दोन पिडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, स्पाचा मालक काफिलउद्दीन हा त्यांना स्पामध्ये ठेवून त्यांच्याकडून व इतर मुलींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेत होता. ग्राहकांकडून मिळालेल्या रक्कमेतून निम्मी रक्कम तो स्वत: घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, हनुमंत गायकवाड यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार बापू लोणकर, पांडे, महिला पोलीस अंमलदार पवार, गायकवाड यांनी केली आहे.
