Pune Crime News | दहावी पास महिलेने गुंतवणुकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवुन कोट्यावधींना घातला गंडा; शिवाजीनगर पोलिसांनी बेळगावहून केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | मुळची कर्नाटकातील बेळगाव येथे राहणारी, दहावी पास असलेल्या महिलेने इतरांच्या मदतीने शिवाजीनगर परिसरात रॉयल ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय सुरु केले. कंपनीत गुंतवणुक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवुन असंख्य गुंतवणुकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर एके दिवशी अचानक कार्यालय बंद करुन ती बेपत्ता झाली. फरार झालेल्या महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव येथून जेरबंद केले आहे.
राजश्री राजेश तुडयेकर Rajashree Rajesh Tudyekar (वय ४२, रा. बेळगाव, कर्नाटक) असे या महिलेचे नाव आहे. तिच्या साथीदारांना कर्नाटकातही अशाच प्रकारे लोकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
राजश्री तुडयेकर हिने शिवाजीनगर येथे रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग या नावाने कंपनीचे कार्यालय सुरु केले. रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये १ लाखांपासून १०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक स्वीकारल्या जातात. तसेच दिलेल्या रक्कमेपैकी ३० टक्के रक्कम शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविली जाते. उरलेली ७० टक्के रक्कम सुरक्षित ठेवली जाते. त्यामुळे गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला जातो, असा तिने दावा केला होता. गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवलेली त्यांना पुढील ५ वर्षाच्या तारखेचा धनादेश दिला जात होता. त्यामुळे लोकांचा विश्वास बसला. ज्यांनी पैसे गुंतवले, त्यांना सुरुवातीला तिने परतावा दिला. त्यानंतर त्यांना तुमच्या ओळखीच्या लोकांना गुंतवणुक करायला सांगण्यास तिने सांगितले. आपल्याला परतावा मिळतोय, असे वाटल्याने या गुंतवणुकदारांनी इतरांना सांगून तिच्या कंपनीत गुंतवणुक केली.
दुसर्याने गुंतवणुक करताना दिलेल्या पैशातून तिने पहिल्याला परतावा दिला जाऊ लागला. मित्राला परतावा मिळतोय हे दिसल्यावर फिर्यादी यांनी २० महिन्यासाठी ४ लाख रुपये ऑक्टोंबर २०२१ मध्ये गुंतविले होते. त्यांना लागलीच १० धनादेश परताव्याचे व १ धनादेश मुद्दलाचे असे ११ धनादेश त्यांना देण्यात आले़. त्यांना नोव्हेबर २०२१ ते जुन २०२२ असे ७ महिने एकूण १ लाख ३६ हजार ५०० रुपये परतावा मिळाला. त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये गुंतवलेल्या २ लाख रुपयांवर दरमहा ९ हजार ५०० रुपये प्रमाणे फेब्रुवारी ते मे २०२२ असे ४ महिने ३८ हजार रुपये परतावा मिळाला. त्यानंतर परतावा मिळाला नाही. त्यांचा प्लॅनची मुदत संपूनही मुद्दल मिळाले नाही. तुमचे पैसे परत करणार असे तिने आश्वासन दिल्याने सर्व जण वाट पहात होते. शेवटी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्यात एमपीआयडी कलम लावण्यात आले. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
गुंतवणूकदारांना पुढील तारखांचे धनादेश दिले असल्याने अनेकांना अजूनही आपली फसवणूक झाल्याची माहिती नाही. त्यानंतर हा गुन्हा पुन्हा शिवाजीनगर पोलिसांकडे तपासला पाठविण्यात आला. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी बेळगावहून या महिलेला अटक करुन पुण्यात आणले. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.
तपास अधिकारी तेजस चोपडे यांनी सांगितले की, या महिलेकडे केलेल्या चौकशीत तिने आपण शेअर मार्केटमध्ये पैसे लावले होते. त्यामध्ये तोटा झाल्याने आपले नुकसान झाल्याचे सांगितले. आतापर्यंत १२ ते १३ गुंतवणुकदार आमच्याकडे आले असून त्यांची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार तेजस चोपडे, आदेश चलवादी, नलिनी क्षीरसागर, सोनाली सुतार, तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार अविनाश दरवडे यांनी केली आहे.
