Pune Crime News | भरदिवसा शेतात काम करणार्या 70 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेच्या डोक्यात, तोंडावर, कानावर वार करुन बेशुद्ध करुन अंगावरचे दागिने नेले चोरुन
पुणे : Pune Crime News | गायींना चरण्यासाठी शेतात गेलेल्या ७० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेच्या डोक्यात, तोंडावर, हातावर, कानावर वार करुन चोरट्याने तिला बेशुद्ध पाडले. तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कर्णफुले चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.
सुमन दत्तात्रय गोरे (वय ७०, रा. गोरे वस्ती, वाघोली) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर येरवडा येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. याबाबत त्यांचा मुलगा दीपक दत्तात्रय गोरे (वय ४६) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वाघोली येथील गोरे वस्तीतील शेत जमिनीमध्ये २० ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक गोरे यांचा खडी क्रशरचा व्यवसाय आहे. त्यांची आई सुमन गोरे या दिवसभर शेतात जात असतात. नेहमीप्रमाणे त्या २० ऑगस्ट रोजी शेतावर गेल्या होत्या. सायंकाळी दीपक गोरे यांना युवराज गोरे यांचा फोन आला. त्यांच्या शेत जमिनीत महिला बेशुद्धावस्थेत पडली आहे. ते तातडीने शेतात पोहचले. त्यांची आई बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या डोक्यावर, दोन्ही हातावर, पंजावर, डाव्या कानावर धारदार शस्त्राने वार केले होते. तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील सोन्याचे कर्णफुले असा १० ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपयांचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेले . त्यांनी आईला तातडीने येरवडा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. उपचारानंतर सुमन गोरे या शुद्धीवर आल्या असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. ही घटना शेतात आडबाजूला घडली असून तो भाग निर्मनुष्य आहे. जवळपास कोठेही सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे तपासात अडचणी आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.
