Sandeep Khardekar | प्लाझ्मा स्पीकर, लेजर लाईटवर पूर्ण बंदी हवी; डीजेचा आवाजही मर्यादेत असावा : संदीप खर्डेकर

Sandeep Khardekar | Wants a complete ban on plasma speakers and laser lights; even DJ sounds should be within limits: Sandeep Khardekar

पुणे : Sandeep Khardekar | सर्वधर्मीय सण, उत्सव आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा स्पीकर आणि लेजर लाईटवर १०० टक्के बंदी घालावी, तर डीजेचा आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा अधिक असू नये, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कर्णकर्कश ध्वनीप्रणालीवर बंदीबाबत घेतलेल्या भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

सण-उत्सव साजरे करताना केवळ गर्दी किंवा लोकानुनयाचा विचार न करता वृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले आणि सामान्य नागरिकांवर मोठ्या आवाजाचा होणारा परिणामही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका, ईदच्या मिरवणुका तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या मिरवणुकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या डीजेचा वापर वाढत चालला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर्णकर्कश आवाजामुळे सामाजिक शांतता भंग होण्याबरोबरच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक मिरवणुकांसाठी समान नियम लागू व्हावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“लोकशाहीत बहुमताला महत्त्व असले तरी प्रत्येक वेळी गर्दीची मानसिकता योग्यच असेल असे नाही. तरुणाई चुकीच्या दिशेने जात असेल तर तिला योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाची आहे,” असे खर्डेकर यांनी म्हटले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कर्णकर्कश साउंड सिस्टीमवर निर्बंध घालण्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. मात्र, हे निर्बंध कोणत्याही एका धर्मापुरते किंवा विशिष्ट उत्सवापुरते मर्यादित न ठेवता सर्वधर्मीय सण-उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती मिरवणुकांसाठी समान पद्धतीने लागू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

गणेशोत्सव उत्साहात आणि दणक्यात साजरा व्हावा, मात्र त्यातील गैरप्रकारांना आळा बसणे तितकेच गरजेचे असल्याचे खर्डेकर यांनी स्पष्ट केले. समाजातील सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन ध्वनीप्रदूषण आणि इतर गैरप्रकारांविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

– संदीप खर्डेकर, अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन

You may have missed