Pune Crime News | कात्रजमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा
पुणे : Pune Crime News | कात्रजमधील संतोषनगर परिसरात भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत एका भटक्या श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शहबाज मेहमूद खान (वय ५२, रा. अशोका आगम बिल्डिंग, संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, संबंधित चारचाकी वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या संबंधित तरतुदींसह प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११ (१) (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांच्या घरासमोर एका भटक्या श्वानाचा नियमित वावर होता. २३ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने या श्वानाला जोरदार धडक दिली. या धडकेत श्वानाचा मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केल्याचे खान यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करत आहेत.
