Pune Crime News | श्रावणात दारु पिऊन येऊन मांसाहरी जेवण मागितल्याने वडिलांनी मारहाण करुन मुलाचा केला खुन
पुणे : Pune Crime News | श्रावणात दारु पिऊन येऊन मांसाहरी जेवण मागितल्याने झालेल्या भांडणात वडिलांनी मारहाण करुन मुलाचा खुन केला. ही बाब आईने लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी दोघा आईवडिलांना अटक केली आहे.
महेश भागवत गायकवाड (वय ३०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. भागवत सूर्यभान गायकवाड Bhagwat Suryabhan Gaikwad (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) अशी अटक केलेल्या आईवडिलांची नावे आहेत.
याबाबत त्यांचा दुसरा मुलगा गणेश भागवत गायकवाड (वय ३४, रा. रामनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजल्यानंतर पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गायकवाड हे पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आईवडिल व लहान भाऊ शेजारीच वेगवेगळे राहतात. त्यांचा लहान भाऊ महेश गायकवाड हा काही काम धंदा करत नाही. महेश याचा १० वर्षापूर्वी विवाह झाला होता. महेश याच्या दारुच्या व्यसनापायी त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. महेश हा एकटा राहत असून तो जेवणासाठी आईवडिलांकडे जातो. तो काहीच कामधंदा करीत नसून दारू पिऊन येतो, या कारणावरुन त्याचे वडिलांबरोबर सतत भांडणे होत होती. दारु पिऊन आल्यावर त्याला जेवणासाठी कायम मांसाहार लागत असे. श्रावण सुरु असल्याने आईवडिल मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात वादावादी होत होती.
२४ ऑगस्ट रोजी महेश हा रात्री दारु पिऊन आला. तो रात्री साडेदहा वाजता घरी गेला. त्यानंतर पहाटे साडेचार वाजता त्यांची आई पार्वती हिने फिर्यादी गणेश यांना झोपेतून उठवून महेश हा उठत नाही. त्याचे शरीर पूर्ण थंड पडलेले आहे़ तू बघ जरा त्याला काय झाले आहे़, असे सांगितले. त्यांनी आईबरोबर महेशच्या घरी जाऊन पाहिले. महेश उताणा झोपलेला दिसून आला. त्याला उठवण्यासाठी डोक्याखाली हात घातला असता त्यांच्या हाताला रक्त लागले. तसेच त्याच्या डोक्याला, नाकाला व तोंडाला जखमा झालेल्या दिसत होत्या. गळ्याभोवती व्रण असल्याचे गणेश यांना दिसले. त्यांनी नातेवाईकांना बोलवून घेतले. नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती कळविली. शवविच्छेदनात डॉक्टरांनी महेशचा मृत्यु श्वसनावरोधामुळे तसेच डोक्याच्या व चेहर्यावरील जखमामुळे झाला असल्याचे सांगितले.
दारु पिऊन आल्यावर मांसाहारी जेवणावरुन वडिल भागवत गायकवाड व महेश यांच्यात भांडणे झाले असल्याने वडिलांनी त्याला डोक्यावर, तोंडावर मारहाण करुन जखमी केले व गळा दाबुन त्याला जीवे ठार मारले असावे. तसेच झालेला प्रकार हा कसा झाला, हे आई पार्वती व वडिल भागवत गायकवाड यांनी लपवून ठेवला असल्याचे फिर्यादी गणेश गायकवाड यांना वाटत आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश देंडे तपास करीत आहेत.
