Pune Crime News | पुणे : खुनाचा प्रयत्न व मोक्काअंतर्गत गुन्ह्यात 3 महिन्यांपासून फरार आरोपी सोलापुरातून अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  खुनाचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना हवा असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक १ ने सोलापूर जिल्ह्यातून जेरबंद केले.

पिंटुसिंग रणबीरसिंग दुधाणी Pintusingh Ranbirsingh Dudhani (वय ४२, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२४ ऑगस्ट २०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे घरफोडी, वाहनचोरी, मोबाईल चोरी, जबरी चोरी, दरोडा तसेच मोक्का गुन्ह्यांतील फरार आणि रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत दुधाणी हा सोलापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुधाणी हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायदा आणि मोक्काअंतर्गत गुन्ह्यात वाँटेड होता.

माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार बाळू गायकवाड, महेश पाटील, अमित गद्रे आणि साई कारके यांचे पथक तातडीने सोलापूरला रवाना झाले.

सोलापूर तालुका पोलिसांच्या मदतीने पथकाने तळे हिप्परगी, जिल्हा सोलापूर येथे आरोपीच्या घराजवळ सापळा रचला. २५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८ वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या सूचनेनुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक १ ने केली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ मारुती खेडकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरी. जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, महेश पाटील, साई कारके, अमित गद्रे, प्रदिप राठोड, रविंद्र लोखंडे, अजित शिंदे, साधना पवार, विद्या पन्हाड व नारायण बनकर यांनी केली आहे.

You may have missed