Pune Crime News | पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून, विश्रांतवाडीतील घटना
पुणे : Pune Crime News | विश्रांतवाडीतील शांतीनगर वसाहतीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली.
सविता सुरेश हरिभक्त (वय ४८, रा. शांतीनगर वसाहत, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा अनिकेत हरिभक्त Aniket Haribhakt (वय ३०) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता या त्यांचे पती, दोन मुले व एक मुलगी यांच्यासह राहत होते. अनिकेत याचा विवाह झाला आहे. त्याची पत्नी, मुलगा त्यांच्या बरोबर राहत नाही. अनिकेत काही काम करत नाही. त्याचा भाऊ, बहीण हे काम करत असून वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
शनिवारी (२९ ऑगस्ट) सविता आणि त्यांचा मुलगा अनिकेत यांच्यात वाद झाला. अनिकेत याने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने आईला मारहाण केली. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती ११२ वरून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील सविता यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी अनिकेत याला ताब्यात घेतले. बराच वेळ तो आईला का मारले याचे कारण सांगत नव्हता. नंतर त्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईला मारल्याचे सांगितले. मध्यरात्री अनिकेत याला पोेलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
