Bibvewadi Pune Fire | बिबवेवाडीत मंडप गोडाऊनला भीषण आग; सिलेंडर स्फोटांनी परिसर हादरला, मोठा अनर्थ टळला
पुणे : Bibvewadi Pune Fire | बिबवेवाडी येथील अप्पर डेपोसमोर असलेल्या काळे मंडप यांच्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी अकराच्या सुमारास भीषण आग लागली. आगीदरम्यान दोन सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये काही काळ मोठी खळबळ उडाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चार अग्निशमन बंब आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. आग वेगाने पसरत असल्याने अतिरिक्त पाण्यासाठी खासगी टँकरचीही मदत घेण्यात आली. गोडाऊनमध्ये मंडप साहित्याबरोबरच सिलेंडरही साठवलेले असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती.
दरम्यान, आगीत दोन सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत गोडाऊनमध्ये प्रवेश केला आणि आणखी सात ते आठ सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यवर्ती अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अधिकारी विजय भिलारे, कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाचे प्रमुख समीर शेख, कोंढवा खुर्द अग्निशमन दलाचे प्रमुख कैलास शिंदे आणि गंगाधाम अग्निशमन दलाचे प्रमुख सुमित नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या भीषण आगीत एक टेम्पो आणि चार ते पाच दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच मंडप साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
