Chakan Pune Crime News | चाकणमध्ये मोठी कारवाई; 84 किलो गांजासह दोघांना अटक, 57 लाखांचा मुद्देमाल जप्त
चाकण : Chakan Pune Crime News | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, गांजा, वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ५७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत राजेंद्र बिरंगळ Aniket Rajendra Birangal (वय २४, रा. खंडोबामाळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक Kushal Uddhav Pathak (वय २४, रा. शिवसाई नगर, कोथरूड, पुणे) अशी आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे गस्त घालत असताना संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली. रुबी बेकरी परिसरातून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी खंडोबामाळ भागात सापळा रचला.
कारवाईदरम्यान संशयितांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गांजासह वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
