Gold-Silver Price Today | अमेरिका-इराण संघर्षाचे जागतिक बाजारपेठेवर सावट; मुंबई, पुण्यासह देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
पुणे – Gold-Silver Price Today | अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या वाढत्या लष्करी तणावाचा आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या ताज्या हल्ल्यांचा थेट परिणाम जागतिक वित्तीय बाजारपेठेवर झाला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून, याचा थेट फटका सोन्या-चांदीच्या दरांना बसला आहे.
जागतिक बाजारपेठेतील घसरणीचा कल कायम राहिल्याने भारतातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या किमतीत लक्षणीय घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेले सोन्याचे भाव आता कमालीचे खाली आले आहेत. या आंतरराष्ट्रीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या मोठ्या गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने बाजारात ही मोठी उलथापालथ झाली आहे.
या नव्या घसरणीनंतर देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर समोर आले आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर घसरून आता १५,८४,३० रुपये (१ लाख ५८ हजार ४३० रुपये) प्रति तोळा (१० ग्रॅम) इतका झाला आहे. तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक तोळा २४ कॅरेट सोन्याचा दर १५,८२,८० रुपये (१ लाख ५८ हजार २८० रुपये) इतका नोंदवला गेला आहे. पुणे आणि नाशिकसारख्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही सोन्याच्या दरात याच पद्धतीची घसरण दिसून आली असून, सोन्यासोबतच चांदीच्या किमतींमध्येही मोठी पडझड झाली आहे.
जागतिक स्तरावर भूराजकीय तणाव वाढलेला असतानाही सोन्याचे दर कोसळल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि सराफा व्यावसायिक दोघेही चक्रावून गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरच्या मूल्यात होणारे बदल, मध्यपूर्वेतील अनिश्चित परिस्थिती आणि मोठ्या जागतिक फंड हाऊसेसकडून होणारी नफाखोरी यामुळे सोन्या-चांदीच्या दरात हा घसरणीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव काही प्रमाणात आटोक्यात आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या तणावामुळे आगामी काळात हे दर कधीही पुन्हा वाढू शकतात, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
