Education News | पाचवी-आठवी उत्तीर्णांनाही दहावीची संधी; ऑनलाइन अर्जासाठी 21 मेपर्यंत मुदत

Education News | 5th-8th passers also get chance to appear in 10th; Deadline for online application till 21st May

पुणे : Education News | पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा देण्याचा मार्ग आता अधिक सोपा झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्रमांक १७ भरून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना २१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दहावीची परीक्षा खासगी उमेदवार म्हणून देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ही विशेष संधी देण्यात आली आहे. जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अटी-शर्तींनुसार नावनोंदणी करता येणार आहे.

नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्हा, तालुका, माध्यम आणि शाखेनुसार उपलब्ध शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावी लागेल. संबंधित संस्थांकडून परीक्षा अर्ज, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

नोंदणी शुल्क नियमित पद्धतीने ऑनलाइन भरावे लागणार असून, विलंब शुल्क किंवा मुदतवाढीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed