PMPML News | पिंपरी मेट्रोसाठी फीडर बससेवा सुरू; 10 रुपयांत काळेवाडी फाट्यापर्यंत प्रवास
पिंपरी : PMPML News | मेट्रो प्रवाशांची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यासाठी पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएलतर्फे पिंपरी मेट्रो स्थानकापासून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे पिंपरी, काळेवाडी आणि रहाटणी परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या नव्या बसमार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती आणि ज्योतिबानगर या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रोशी जोडणी मिळाली आहे. प्रवाशांना अवघ्या १० ते २० रुपयांत हा प्रवास करता येणार असल्याने ही सेवा किफायतशीर ठरणार आहे.
गर्दीच्या वेळेत या मार्गावर दर १५ मिनिटांनी, तर कमी गर्दीच्या वेळेत दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध असेल. पिंपरी मेट्रो स्थानकावरून पहिली बस सकाळी साडेसहा वाजता, तर काळेवाडी फाट्यावरून सकाळी सात वाजता सुटेल. पिंपरीहून शेवटची बस रात्री नऊ वाजता, तर काळेवाडी फाट्यावरून रात्री साडेनऊ वाजता रवाना होईल.
या फीडर बससेवेच्या माध्यमातून रहिवासी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला स्वस्त, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या शहरातील दहा मेट्रो स्थानकांवरून २३ मार्गांवर ८३ फीडर बस सेवा सुरू असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
