FDA News | पुणे: गणेशोत्सवात महाप्रसाद वाटपासाठी अन्न परवाना बंधनकारक; गणेश मंडळांसाठी FDAचे नवे नियम

FDA News | Pune: Food license mandatory for distributing Mahaprasad during Ganeshotsav; new FDA rules for Ganesh Mandals

मुंबई/पुणे : FDA News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचे वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना तात्पुरता अन्न परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भाविकांची सुरक्षितता आणि महाप्रसादाची गुणवत्ता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

नव्या प्रक्रियेनुसार मंडळाच्या अध्यक्षाने किंवा अधिकृत प्रतिनिधीने आवश्यक अर्ज तयार करून तो ई-मेलद्वारे पाठवावा लागणार आहे. त्यानंतर festivals.mahafda.in या संकेतस्थळावर Stall Holder या श्रेणीत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या तात्पुरत्या परवान्यासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

अर्जामध्ये महाप्रसाद तयार करणाऱ्या स्वयंपाकी किंवा केटररचे नाव तसेच त्याचा FDA परवाना क्रमांक नमूद करणेही आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि त्याचा स्रोत याबाबत योग्य नोंद ठेवणे शक्य होणार आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून भाविकांची सुरक्षितता आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाटप होणाऱ्या अन्नाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

हा निर्णय FDAच्या राज्यव्यापी नव्या मानक कार्यपद्धतीचाही भाग आहे. यापुढे महाप्रसाद, इफ्तार, लंगर आणि भंडारा यांसारख्या मोठ्या प्रमाणावरील अन्नवाटप कार्यक्रमांच्या आयोजकांना किमान सात दिवस आधी FDAला माहिती द्यावी लागेल. तसेच अन्न तयार करण्यासाठी परवानाधारक केटररचीच नियुक्ती करावी लागणार आहे.

गणेशोत्सव जवळ आल्याने ऐनवेळी अडचण निर्माण होऊ नये यासाठी मंडळांनी परवाना आणि नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed