Pune Crime News | पुणे : बनावट कागदपत्राच्या आधारे दीड कोटींचे कर्ज घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी रश्मी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक नीला मनोहरलाल गुप्ता यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | रश्मी एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात असलेल्या ५० कोटी रुपयांची जमीन तारण ठेवून कोणताही अधिकार नसताना दीड कोटी रुपयांचे कर्ज घेऊन संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी रश्मी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक नीला मनोहरलाल गुप्ता यांच्यासह तिघांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रश्मी एज्युकेशन सोसायटीचे सचिव परमेश्वर व्यंकटराव सोळुंके (वय ५९, रा. नाथपुरम हाऊसिंग सोसायटी, छत्रपती संभाजीनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नीला मनोहरलाल गुप्ता (Neela Manoharalal Gupta), रश्मी मनोहरलाल गुप्ता (Rashmi Manoharalal Gupta), सुलभा मोडक (रा. येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना येरवड्यातील रश्मी एज्युकेशन सोसायटी येथे २२ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीला गुप्ता या रश्मी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक आहेत. त्यांनी १९८४ मध्ये रश्मी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. धर्मादाय आयुक्तांकडे त्याची नोंदणी केली. संस्थेची २ एकर ३४ आर जमीन असून ती शासनाने भाडेतत्वावर दिली आहे. तेथे प्रि प्रायमरी ते १० वीपर्यंतची शाळा चालविली जाते. २००७ मध्ये नीला गुप्ता यांनी सामाजिक परिचयातून सध्याचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी व परमेश्वर साळुंके यांच्याशी संपर्क साधला. शाळा आर्थिक अडचणीत आहे. आम्ही सर्व ७ विश्वस्त बाहेर पडतो, तुम्ही संस्थेत विश्वस्त म्हणून सामील व्हा, मला मध्य प्रदेशातील मुळ गावी इंदौर येथे स्थायिक व्हायचे आहे, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राघवेंद्र जोशी, परमेश्वर साळुंके, संजय शिरसीकर, दिलीप रेड्डे असे चौघे विश्वस्त झाले. हे चौघे व नीला गुप्ता, त्यांचा मुलगा बादल गुप्ता, मुलगी रश्मी गुप्ता असे ७ विश्वस्त झाले. शासनाने लीजवर दिलेली जमीन नवीन चौघा विश्वस्तांनी २०१० मध्ये स्वत:च्या खर्चातून शासनाकडून संस्थेच्या नावावर करुन घेतली आहे. तसेच या जागेची सीमा भिंत, शेड, इमारत बांधकाम व इतर सर्व खर्च नव्या विश्वस्तांनी केला आहे.
२०११ मध्ये बादल मनोहरलाल गुप्ता व रश्मी गुप्ता यांनी त्यांचे वैयक्तिक कारणास्तव संस्थेत काम करायचे नाही, म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयात राजीनामे सादर केले होते. हे दोघे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागेवर अदिती राघवेंद्र जोशी व विजय राजाराम पाटील यांना विश्वस्त नेमण्यात आले. नीला गुप्ता व रश्मी गुप्ता यांनी आमचे इंदौर येथे जाणे रद्द झाले आहे. वय झाले असल्याने मी व मुलगी काही दिवस राहून शाळा पाहतो, अशी विनंती केल्यावर त्यांना शाळेच्या कॅम्पसमध्ये राहण्यास परवानगी दिली. २०१७ मध्ये नीला गुप्ता यांनी त्यांना अंधारात ठेवून इतर ६ विश्वस्तांचे खोटे राजीनामे तयार करुन सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सादर करुन तेथील लोक अदालतमध्ये बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करुन मंजूर करुन घेतले. त्यांनी नवीन ६ विश्वस्त सहभागी करुन घेतले. त्यातून जुने व नवीन विश्वस्त यांच्यात वाद निर्माण झाला. हे छत्रपती संभाजीनगर येथील राहणारे असल्याने त्यांना हे सर्व उशीरा समजले. त्याविरोधात त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अपील केले. फिर्यादी यांच्या विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांकडून मंजूरी मिळाली. संस्थेच्या विश्वस्त मंडळातून नीला मनोहरलाल गुप्ता यांना कमी करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना संस्थेच्या संबंधित कोणतेही अधिकार राहिले नाहीत. त्याविरोधात नीला गुप्ता यांनी न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याविरोधात संस्थेच्या सध्याच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालयात २९ सप्टेंबर २०२५ रोजी अपिल दाखल केले असून न्यायालयाने सह धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. याची सुनावणी प्रलंबित आहे.
फिर्यादी व इतर कायदेशीर विश्वस्त असताना नीला गुप्ता, रश्मी गुप्ता व सुलभा मोडक या कोणत्याही प्रकारे विश्वस्त नाहीत. त्यामुळे त्यांना संस्थेचे मालमत्ता व इतर कोणत्याही बाबी संदर्भात कोणतेही अधिकार नाहीत. असे असताना त्यांनी अधिकृत विश्वस्त मंडळाचे परस्पर २२ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या नावावर असलेली मालमत्ता २ एकर ३४ आर असलेली अंदाजे ५० कोटी रुपयांची जमीन अवान्से फायनान्शिअल सर्व्हिसेस, मुंबई यांच्याकडे नोंदणीकृत गहाण खत केले. त्याद्वारे १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज स्वत:च्या फायद्याकरीता घेतलेले आहे. कर्ज घेतेवेळी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेतलेली नाही. तसेच संस्थेची जमीन ही भोगवटादार वर्ग २ ची असल्याने जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांची सुद्धा परवानगी घेतली नाही. कोणतेही अधिकार नसताना ५० कोटींची मालमत्ता परस्पर गहाण ठेवून त्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज घेऊन संस्थेची फसवणूक केली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज आला होता. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे तपास करीत आहेत.
