Pune Crime News | मुंढवा (पुणे) : “येथे काम करायचे असल्यास टक्केवारी द्यावी लागेल” ! केशवनगरमधील बांधकाम साईटवर बांधकाम सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी
पुणे/मुंढवा : Pune Crime News | केशवनगरमधील एका बांधकाम साईटवर काम सुरू ठेवण्यासाठी कथितरीत्या टक्केवारीच्या स्वरूपात खंडणीची मागणी करून सुपरवायझर आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी अक्षय घुले (वय २८), मेघराज घागडे, हेमराज फडतरे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रणजित दत्तात्रय जवळकर (वय २९, रा. दरेकरवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी ७ सप्टेंबर रोजी पहाटे दोन ते पाच या वेळेत आणि ८ सप्टेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास कल्याणी बंगला रस्त्यावरील पूर्वाकरा बिल्डरच्या बांधकाम साईटवर आले होते.
चारचाकीतून आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि साईट सुपरवायझर नईम शेख यांना धमकावल्याचा आरोप आहे.
“येथे काम करायचे असल्यास टक्केवारी द्यावी लागेल,” अशी कथित मागणी करून पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
