Ghaiwal Gang News | ‘फेस टाइम’वरून नीलेश गायवळशी संपर्क; सचिन गायवळच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ
पुणे : Ghaiwal Gang News | कोथरूडमधील किरकोळ वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात परदेशात फरार असलेला कुख्यात आरोपी नीलेश गायवळ हा त्याचा भाऊ सचिन गायवळ याच्याशी ‘फेस टाइम’ ॲपच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती पुणे पोलिसांनी विशेष न्यायालयात दिली. फरार असताना नीलेश गायवळ आपल्या एका कामगाराचे एटीएम कार्ड वापरत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी सचिन गायवळकडून चार मोबाइल फोन, एक लॅपटॉप आणि पाच पेनड्राइव्ह जप्त केले असून, त्यांची तपासणी सुरू असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी केली.
यावर विशेष न्यायालयाने सचिन गायवळच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली.
दरम्यान, कोथरूड परिसरातील दहा सदनिका बळकावल्याच्या आरोपांसह गायवळ बंधूंविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर पुण्यातून फरार झालेल्या सचिन गायवळला पुणे पोलिसांनी गेल्या बुधवारी राजस्थानातून अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे आणि तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शैलेश संखे यांनी तपासातील प्रगतीची माहिती न्यायालयासमोर मांडली.
